गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे सध्या हवेच्या प्रदुषणा (Air Pollution)मध्येही वेगाने वाढ होत आहे. चीन, अमेरिका, रशिया, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त हवेचे प्रदूषण असणारे देश आहेत. भारतात 2015 साली विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे तब्बल 25 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आता ट्रॅफिकमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे भारतामध्ये साडेतीन लाखांहून अधिक मुले अस्थमाने ग्रस्त असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे आता मोठ्यांच्या फुफ्फुसांवर आणि हृदयावरच नाही तर लहान मुलांच्या आरोग्यावरही प्रदूषणाचा वाईट परिणाम होत आहे.
यासाठी जगभरातील 194 देशांमध्ये, 125 प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरातील चार दशलक्ष मुलांना दमा होतो. अंदाजानुसार दरवर्षी दर 100,000 मुलांपैकी 170 मुले ही वाहतूक प्रदूषणामुळे झालेल्या अस्थम्याने ग्रस्त आहेत. तर दरवर्षी 13 टक्के बालकांचे वाहतूक प्रदूषणामुळे झालेल्या दम्याचे निदान झाले आहे. काही वर्षांपूर्वी चौथ्या क्रमांकावर असणारा भारत मागील काही महिन्यांपासून चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(हेही वाचा: महाराष्ट्रातील तब्बल 17 शहरे प्रदूषित; तातडीने उपाययोजना करण्याची सूचना)
अमेरिकेमध्ये अस्थमाने पीडित असणाऱ्या मुलांची संख्या 2 लाख 40 हजार, इंडोनेशियामध्ये 1 लाख 60 हजार आणि ब्राझीलमध्ये 1 लाख 40 हजार होती. तर भारतामध्ये दरवर्षी तब्बल 7 लाख 60 हजार मुले ही वाहतूक प्रदूषणामुळे होणाऱ्या दम्याची शिकार बनतात. हवा प्रदुषणामुळे फक्त 2015 मध्ये भारतात जवळजवळ 18 लाख लोक मृत्यू पावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फक्त चीन आणि भारतातील मृतांचा आकडा हा जगभरातल्या आकडेवारीच्या अर्ध्याहून जास्त आहे. संशोधकांनी सांगितले की, जर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही ठोस पावले उचलली तर अस्थमासारख्या आजाराला आळा घालणे सहज शक्य आहे.