Union Health Minister Dr Harsh Vardhan (PC - ANI)

Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशातच आता भारतातही कोरोनाची लागण झालेले 2 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन प्रवासी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार, चीन आणि इराणला जाणाऱ्या नागरिकांना व्हिसा देण्यात येणार नाही. तसेच गंभीर परिस्थितीत इतर देशात जाण्यासही मनाई केली जाण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे. हर्षवर्धन यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

यावेळी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी भारतीयांना चीन, इराण, कोरिया, सिंगापूर आणि इटलीचा प्रवास करणे टाळा, असा सल्लाही दिला आहे. देशात आज कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण आढळले. यातील एक रुग्ण दिल्ली तर दुसरा रुग्ण तेंलगणामधील आहे. तसेच राजधानी दिल्लीत आढळलेला कोरोनाचा रुग्ण हा नुकताच इटलीतून आला होता. या रुग्णावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच तेलंगणा येथे आढळलेला दुसरा रुग्ण हा दुबईतून भारतात आला आहे. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून परदेशात जाणे टाळावे, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: जगभरात COVID-19 ने घेतले 3000 बळी; 88,000 जणांना लागण)

कोरोना व्हायरमुळे आतापर्यंत जगभरात 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 88,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. केवळ एकट्या चीनमध्ये या व्हायरमुळे 2912 जणांचा बळी गेला आहे. आज अमेरिकेमध्येदेखील कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियामध्येही या व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोनाची दहशत पसरली आहे.