Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना वायरसने बळी घेतलेल्यांची संख्या आज (2 मार्च ) जगभरात 3000 पर्यंत पोहचली आहे. तर COVID-19 ची लागण झालेल्यांची संख्या 88,000 पर्यंत पोहचली आहे. तर चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या या वायरसमुळे बळींची संख्या चीनमध्ये 2912 इतकी आहे. तर 2 मार्चपर्यंत कोरोना 202 नव्या रूग्णांची नोंद झाल्याची माहिती देखील द नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. अमेरिकेमध्येही कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. Corona चा हाहाकार! चीन पाठोपाठ आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे बळी, वाचा सविस्तर

दरम्यान डिसेंबर 2019 पासून कोरोना वायरसची दहशत आता जगभर पसरत आहे. अंटार्टिका वगळता सध्या जगातील 60 देशांमध्ये त्याची लागण झपाट्याने पसरत आहे. अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियामध्येही या व्हायरसने पहिला बळी घेतला आहे. तर साऊथ कोरियामध्ये 4000 पेक्षा अधिक रूग्ण कोरोना वायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना वायरसची लागण 60 वर्षापेक्षा अधिकच्या लोकांना तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांना अधिक पटकन होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक कोरोनाग्रस्त रूग्णांना या आजाराची केवळ सौम्य लक्षणं दिसत आहेत. तर 14% लोकांना न्युमोनिया असल्याचं आढळत असल्याचे सांगण्यात आले आहे.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर 2-5% आहे. COVID-19 च्या तुलनेत Middle East respiratory syndrome (Mers) ने घेतलेल्या बळींचं प्रमाण 34.5% होतं तर severe acute respiratory syndrome (Sars)ने घेतलेल्या बळींचं प्रमाण 9.5% होतं.