वेतन सुधारणेबाबत भारतीय बँक असोसिएशन (IBA) यांच्याशी सुरू असलेल्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर, बँक संघटनांनी आता पुन्हा एकदा देशव्यापी संपाची (Bank Strike) हाक दिली आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असा दोन दिवसांचा देशव्यापी बँक संप पुकारला आहे. शुक्रवारी 31 जानेवारी आणि शनिवार 1 फेब्रुवारी आहे, त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, 1 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) हे नऊ कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व करते, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे 11 ते 13 मार्च या कालावधीतही तीन दिवसांच्या संपाचे आयोजन केले जाणार आहे.
यूएफबीयूचे स्टेट कन्वेनर सिद्धार्थ खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेने 1 एप्रिलपासून अनिश्चित संपावर जाण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यूएफबीयू पगारामध्ये किमान 15 टक्के वाढीची मागणी करीत आहे, परंतु आयबीएने केवळ 12.25 टक्के वेतनवाढीवर सहमती दर्शविली आहे. ही गोष्ट यूएफबीयूला मान्य नाही. वेतन पुनरीक्षण संदर्भातील शेवटची बैठक 13 जानेवारी रोजी पार पडली. (हेही वाचा: सरकारी आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी बँक कर्मचारी 8 जानेवारीला देशव्यापी संप पुकारणार)
यापूर्वी 8 जानेवारी रोजी 6 बँक कर्मचारी संघटनांनीही भारत बंदमध्ये भाग घेतला होता. त्या दिवशी बर्याच बँका बंद ठेवल्या गेल्या होत्या. या संपामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. यावेळी बँक संपाची वेळ अत्यंत महत्वाची आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील, त्यापूर्वी एक दिवस म्हणजे 31 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि आर्थिक मंदी कमी करणे हे सरकारसमोर मोठे आव्हान आहे.