सरकारी आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी बँक कर्मचारी 8 जानेवारीला देशव्यापी संप पुकारणार
प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

सरकारी आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीला देशव्यापी संपाची (Nationwide Strike) हाक दिली आहे. यामध्ये सर्व सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. सरकारी बँक कर्मचारी संघटनेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, 'बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया' (Bank Employees Federation of India) आणि 'ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन' (All India Bank Employees Association) या संघटनांनी आपल्या सदस्य कर्मचाऱ्यांना 8 जानेवारी रोजी संप पुकारण्याचे आवाहन केले आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे बँक ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

बँक बंद असल्यामुळे पैसै काढण्यासाठी एटीएमवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी 8 जानेवारी अगोदर आपली बँक कामे करणं गरजेचे आहे. बँकिंग सुधारणा, बँकांचे विलीनीकरण याचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. तसेच वेतनवाढ करण्यात यावी, अशी मागणीही बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. (हेही वाचा - केंद्र सरकारच्या कामगाराविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांची 8 जानेवारीला देशव्यापी संपाची हाक)

बँक कर्मचाऱ्यांबरोबरच कामगार संघटनांनी 8 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेनेनेही उडी घेतली आहे.