Pulwama Encounter: पुलवामाच्या झाडोरा भागात झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, तर एका सैनिकाचा मृत्यू
Pulwama Encounter (PC - ANI)

Pulwama Encounter: जम्मू-कश्मीर खोऱ्यात पुलवामाच्या झाडोरा भागात (Zadoora Area) काल रात्री सुरू झालेल्या चकमकीत पोलिस आणि सुरक्षा दलाने 3 अज्ञात दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला. सुरक्षा दलाकडून आणखी दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा मृत्यू झाला. संयुक्त ऑपरेशन प्रगतीपथावर असल्याची माहिती श्रीनगरमधील पीआरओ डिफेन्सने दिली आहे.

दरम्यान, पुलवामाच्या झाडोरा भागात काल रात्री ही चकमक सुरु झाली होती. अद्याप या दहशतवाद्यांची नावे आणि ते कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत, हे समजू शकलेले नाही. सध्या घटनास्थळी आणखी दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. (हेही वाचा - Coronavirus: नियमांचे उल्लंघन, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल)

शुक्रवारी शोपियनमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले होते. जम्मू-काश्मीर खोऱ्यात मागील 24 तासात सुरक्षा दलांनी आतापर्यंत एकूण 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियां जिल्ह्यातील किलूरा भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर या परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करणे सुरू केले. त्यानंतर या भागात चकमक सुरू झाली.