ट्रायच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढली; आता 31 मेपर्यंत वाहिनीनिवडीचे स्वातंत्र्य
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आता चक्क तिसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आली आहे. आपल्याला हव्या त्या वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य ट्रायने ग्राहकांना दिले होते, यासाठी 31 मार्च ही मुदत दिली होती. मात्र अजूनही हवातसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी 31मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जर 31 मी पर्यंत ग्राहकांनी वाहिन्या निवडल्या नाहीत तर त्यांना बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे टीव्ही पाहावा लागणार आहे. यासाठी आधी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर ती 31 जानेवारी झाली, शेवटी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती.

काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या डीटीएच (DTH) सेवेने टीव्ही विश्वात क्रांती केली. मात्र यामध्ये एण्टरटेनमेंट, किड्स, नॉलेज, स्पोर्ट्ससारख्या महागड्या वाहिन्यांचा पॅक निवडावा लागत असे, त्यानुसार दर आकारले जात असत. मात्र यामुळे ग्राहकांना नको असलेया वाहिन्यांचेही पैसे भरावे लागत होते. मात्र आता लागू झालेल्या नव्या नियमानुसार तुम्हाला जितक्या वाहिन्या पहायच्या आहेत त्याच वाहिन्यांचे दर आकारले जाणार आहेत, असे ट्रायकडून सांगितले गेले होते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना पहिल्यापेक्षा जास्त दर भरावे लागत असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: एका केबल कनेक्शनमध्ये दोन टीव्ही सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त 50 रुपये)

वाहिन्यांची निवड करण्याची प्रक्रियादेखील क्लिष्ट असून ब्रॉडकास्टर्स व एमएसओनी विविध पॅक तयार केले आहेत. मात्र या प्रत्येक पॅकमध्ये हव्या असलेल्या वाहिन्या नाहीत आणि हव्या असलेल्या वाहिन्या घेताना सिंगल वाहिनीचे दर परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळेच या वाहिन्यानिवडीसाठी ग्राहकांकडून टाळाटाळ होताना दिसून येत आहे. शेवटी या नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत आता 31 मे करण्यात आली आहे.