व्याभिचार: विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ४९७ रद्द
सर्वोच्च न्यायालयाने व्याभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द केले (संपादित प्रतिमा)

व्याभिचाराला गुन्हा ठरवणारे कायद्यातील कलम ४९७ हे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवलं आहे. त्यामुळे यापुढे विवाहबाह्य संबंध म्हणजेच व्याभिचाराला गुन्हा मानता येणार नाही. महिलेचा सन्मान हा वरिष्ठ आहे. पती तिचा मालक असू शकत नाही. त्यामुळे व्याभिचार हा गुन्हा नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. तसेच, व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं कायद्यातील कलम असंवैधानिक असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

स्त्री-पुरुषांना समान अधिकार

पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या पीठातील मूख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांनी भारतीय दंड संहिता कलम ४९७ ला गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढण्याचे आदेश दिले. सीजेआय आणि न्यायमूर्ती खानविलकर यांनी न्यायालयाचा निर्णय देताना सांगितले की, व्याभिचार हा घटस्फोटाचा अधार होऊ शकतो. मात्र, त्याला गुन्हा ठरवता येणार नाही. हा निर्णय देताना न्यायाधीशांच्या पीठामध्ये न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि इंदु मल्होत्रा यांचाही समावेश होता.

आत्महत्या केल्यास खटला

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, व्याभिचार हा गुन्हा नाही. मात्र, पत्नीने जर आपल्या भूतकाळातील व्याभिचारामुळे आत्महत्या केली असेल. तर, पुरावा मिळाल्यास संबंधीत व्यक्तिवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

निकाल राखून ठेवला होता

दरम्यान, मुख्य न्यामूर्ती दीपक मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या पाच सदस्यीय पीठाने आठ ऑगस्ट रोजीच या कलमाबाबत निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता.

सुमारे १५८ वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ४९७ अन्वये विवाहबाह्य संबंध गुन्हा मानन्यात आले होते. यात विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषालाही गुन्हेगार ठरवले जात होते.