SC On Delhi Pollution: वाढत्या प्रदुषणामुळे दिल्लीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातचं आता दिल्लीतील प्रदुषणावरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्ली सरकारला (Delhi Government) फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रदूषण प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली सरकार आणि पोलिसांना कडक निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत प्रवेश करण्याच्या सर्व 113 ठिकाणी तातडीने चौक्या उभारण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात सूचना देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एंट्री पॉईंट्सवर तैनात कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या अंतर्गत परवानगी असलेल्या वस्तूंबद्दल स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 113 प्रवेश बिंदूंपैकी, 13 प्रमुख प्रवेश बिंदूंवर प्रामुख्याने GRAP फेज IV च्या कलम A आणि B चे पालन सुनिश्चित करण्यासाठी निरीक्षण केले जाते. सुमारे 100 एंट्री पॉइंट्सवर ट्रकच्या प्रवेशाची तपासणी करण्यासाठी कोणीही नाही. सर्वोच्च न्यायालय आणि CAQM ने आदेश देऊनही, दिल्ली सरकार आणि पोलीस GRAP फेज IV अंतर्गत कलमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरले आहेत. (हेही वाचा - Delhi Pollution, AQI Drops: दिल्लीमध्ये वायुप्रदूषण कायम, AQI 'अत्यंत खराब' स्थितीत; संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून कठोर उपाययोजना)
दरम्यान, न्यायालयाने लवकरात लवकर सीसीटीव्ही फुटेज ॲमिकस क्युरीला देण्याचे निर्देश दिले आहेत. बारचे 13 वकील विविध एंट्री पॉइंट्सला भेट देतील आणि GRAP फेज IV च्या कलमांचे त्या एंट्री पॉईंट्सवर पालन केले जात आहे की नाही हे शोधून काढण्यात येईल, असही न्यायालयाने म्हटलं आहे. (हेही वाचा, Delhi Air Pollution: दिल्लीतील वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत; GRAP-IV निर्बंध लागू, शाळांना सुट्टी, वर्ग ऑनलाईन सुरु)
दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' श्रेणीत -
शुक्रवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' श्रेणीमध्ये नोंदवली गेली. तसेच परिसरात धुक्याचा पातळ थर दिसला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, सकाळी 7.15 वाजेपर्यंत दिल्लीतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (AQI) सरासरी 371 होता. एनसीआरच्या इतर शहरांमध्ये, फरिदाबादमध्ये AQI 263, गुरुग्राममध्ये 281, गाझियाबादमध्ये 274, ग्रेटर नोएडामध्ये 234 आणि नोएडामध्ये 272 होता. दिल्लीच्या सात भागात AQI पातळी 400 च्या वर आणि 450 च्या दरम्यान राहिली. दिल्लीच्या इतर भागांतील AQI 'अत्यंत खराब' श्रेणीत आहे.
तथापी, CPCB नुसार, 200 ते 300 मधील AQI 'खराब' मानला जातो, 301 ते 400 ला 'खूप खराब' मानला जातो, 401-450 'गंभीर' आणि 450 आणि त्यावरील 'गंभीर प्लस' मानला जातो. राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषण कमी करण्यासाठी, नवी दिल्ली महानगरपालिका (NDMC) ने शुक्रवारी सकाळी अनेक ठिकाणी रात्रीची स्वच्छता आणि रस्ते स्वच्छता मोहीम राबवली.