Solapur Lok Sabha 2024: राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ सोलापुरात जाहीर सभा
Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Solapur Lok Sabha 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ ते अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. सोलापूर मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) सोलापुरातील एक्झीबिशन मैदानावर 3 वाजता सभा घेणार आहे. त्याआधी ते अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार(Campaign)साठी 11 वाजता सभा घेतील. त्यानंतर ते सोलापुरच्या दिशेने रवाना होतील आणि 3 वाजता प्रणिती शिंदे याच्या प्रचारासाठी सभा घेतील. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज नवनीत राणा (Navneet Rana)यांच्या प्रचारासाठी अमरावती (Amravati Lok Sabha)त येणार आहेत.(हेही वाचा :Rahul Gandhi On BJP: नरेंद्र मोदी महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही, राहुल गांधींचा गंभीर आरोप )

राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यातील दोन्ही सभांसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी यांनी या आधीही पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भंडारा-गोंदिया मतदारसंघात उमेदवारांसाठी प्रचार सभा घातल्या होत्या. इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते सभा घेत आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची याच महिन्यात १४ एप्रिल रोजी नागपुरमध्ये जाहीर सभा झाली होती. आता राहुल गांधी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. तर गृहमंत्री आणि भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमरावतीत येणार आहेत.