Sugar | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Sugar Prices: साखरेच्या दराने गेल्या 6 वर्षांचा विक्रम मोडला आहे. न्यूयॉर्कमध्ये साखरेचे दर (Sugar Rate) 6 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. किंबहुना, भारताने साखरेची निर्यात मर्यादित केल्यानंतर जागतिक पुरवठ्याची चिंता वाढली आहे. भारतातील साखरेचे कमी उत्पादन तसेच पाकिस्तान आणि थायलंडसह इतर देशांकडून होणारा तगडा पुरवठा यामुळे या आठवड्यात कच्च्या साखरेच्या किमती 5% वाढल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या साखरेच्या किमती 2.2% वाढून 23.46 सेंट्स प्रति पौंड झाल्या.

ब्राझील आणि भारतातील साखर कारखानदारांनी पेट्रोलसाठी इथेनॉल बनवण्यासाठी जास्त उसाचा वापर केल्याने साखरेचे दरही वाढले आहेत. साखर उत्पादनात झालेली घट मोठी आहे, असे प्राइस फ्युचर्स ग्रुपचे उपाध्यक्ष जॅक स्कोविले यांनी म्हटल आहे. (हेही वाचा - CNG-PNG दरांबाबत सामान्यांना दिलासा, केंद्र सरकारने निश्चित केले धोरण)

अन्न मंत्रालयाने 60 लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली आहे. भारताचे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी गुरुवारी सांगितले की, सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या विपणन वर्षात अतिरिक्त साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली जाणार नाही. कारण, देशातील साखर उत्पादन लक्ष्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. अन्न मंत्रालयाने चालू विपणन वर्ष 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी 6 दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. व्यापार अहवालानुसार, यापैकी आतापर्यंत सुमारे 40 लाख टन साखर निर्यात झाली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे.