Holi Festival Guidelines: दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह 'या' राज्यात  होळी साजरी करण्यास प्रतिबंध; जाणून घ्या तुमच्या राज्यातले निर्बंध
Representational Image (Photo Credits: File Image)

Holi Festival Guidelines: यंदा होळीच्या सणावर कोरोना विषाणूचं सावट आहे. देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारची चिंता वाढविली आहे. यावेळी देशातील बर्‍याच भागात होळीचा रंग फिकट झाला आहे. अनेक राज्यांमध्ये होळीसंदर्भात निर्बंध घालण्यात आले आहेत. होळीसह आगामी उत्सवांमधील गर्दी थांबविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, देशातील अनेक राज्यांनी नागरिकांना होळी संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व आरोग्य विभाग वारंवार इशारा देत आहे. हा उत्सव केवळ सरकारने ठरविलेल्या कोविड प्रोटोकॉल अंतर्गतचं साजरा करावा, अशा आशयाच्या सूचना सरकार सतत देत आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यास सांगितले आहे. याशिवाय राज्यांनी आपल्या स्तरावर मार्गदर्शक तत्त्वेही जारी केले आहेत. (वाचा - Coronavirus Update in India: भारतात कोरोना रुग्ण संख्येत मोठी भर, गेल्या 24 तासात देशात 68,020 नवे कोरोना रुग्ण; तर 291 जणांचा मृत्यू)

दिल्ली -

राजधानी दिल्लीत नागरिक होळीसह इतर सणांनिमित्त सार्वजनिक कार्यक्रम करू शकणार नाही. येथे एकत्रित होळी खेळण्यास परवानगी नाही. सरकारने लोकांना त्यांच्या घरी होळी खेळायला सांगितले आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी होळीचा सण निषिद्ध असेल. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे दिल्ली पोलिसांनी शनिवारी सांगितले. या अंतर्गत लोक उद्याने किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत.

महाराष्ट्र -

कोरोना संसर्गाबाबत महाराष्ट्रात चिंताग्रस्त परिस्थिती आहे. राज्य सरकारने 28 मार्चपासून महाराष्ट्रात रात्रीच्या कर्फ्यूमध्ये वाढ केली आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यास बंदी आहे. लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात अशी सविस्तर योजना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जेणेकरून अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम होईल. औरंगाबाद आणि नागपुरात संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. नागपुरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे, तर औरंगाबादमध्ये 30 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान लॉकडाउन असेल.

उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेशमध्ये होळीपूर्वी सरकारने विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार नागरिकांना यंदा होळीनिमित्त कोणत्याही प्रकारचा उत्सव करता येणार नाही. नागरिकांना कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने परवानगीशिवाय होळी मिलन उत्सव आयोजित करण्यास बंदी घातली आहे. जर कोणाला हा कार्यक्रम करायचा असेल तर त्यांना प्रशासनाकडून यासंदर्भात परवानगी घ्यावी लागेल. लोकांना मास्क आणि सेनिटायझर वापरणे बंधनकारक असेल. सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमल्यास ती जबाबदारी पोलिसांची असेल. योगी सरकारने कोविड हेल्प डेस्क राज्यात पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त, पहिली ते आठ पर्यंतच्या सर्व परिषद आणि खासगी शाळांमध्ये 24 ते 31 मार्च दरम्यान होळीची सुट्टी असणार आहे.

बिहार-

बिहारच्या नितीश सरकारनेही होळीच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. कोविडची प्रकरणेही येथे वाढत असल्याने होळी दरम्यान सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे.

हरियाणा -

राज्य सरकारने होळीच्या सणासंदर्भात सार्वजनिक उत्सवावर बंदी घातली आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्विट करत होळी साजरा करण्यास बंदी असल्याच्या सूचना दिल्या आहेत.

गुजरात -

वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने होळीदरम्यान सार्वजनिक उत्सवास बंदी घातली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे.

पंजाब -

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात होळी मिलन उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यापूर्वीचं नाईट कर्फ्यू लागू आहे. वाढत्या कोरोना प्रकरणे लक्षात घेता येथे कोरोना चाचण्या वाढविण्यात येत आहेत.