Presidential Elections 2022 मध्ये शिवसेना महत्त्वाच्या भूमिकेत; विरोधक की NDA कुणाची साथ निभावणार याकडे लक्ष!
shivsena | (Photo Credit: File Photo)

आज निवडणूक आयोगाकडून सध्याचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै 2022 ला संपत असल्याने नव्या राष्ट्रपतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जर ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी 18 जुलै दिवशी निवडणूक होणार आहे तर 21 जुलैला मतमोजणी होईल. त्यामुळे आता या निवडणूकीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. आता नवा राष्ट्रपती पदासाठीचा चेहरा कोण असेल यासाठी अनेक नावं चर्चेमध्ये आहे. नव्या राष्ट्रपती पदी महिला येणार का? मागासवर्गीयांमधून कोणाला संधी मिळणार याची देखील चर्चा रंगत आहे. दरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी आता होणारी ही राष्ट्रपती पदाची निवडणूक ही देशात भाजपा विरूद्ध विरोधक यांच्या लढतीची एक चुणूक दाखवणारी ठरू शकते.

राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाल्यास ती एक किचकट प्रक्रियेमधून पूर्ण होते. देशात प्रत्येक राज्यातील विधानसभेत आणि देशाच्या संसदेमध्ये त्यासाठी मतदान होते. अशामध्ये महाराष्ट्रात आता शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. भाजपाची काही राज्यांमध्ये शक्ती कमी झाली आहे. त्यापैकी एक महाराष्ट्र देखील आहे. सोबतच एनडीए मधूनही अनेक पक्ष भाजपाची साथ सोडून गेले आहेत त्यामुळे देशपातळी वर पुन्हा अंकगणित मांडून नवा राजकीय डाव रंगण्याची शक्यता देखील नाकारता येऊ शकत नाहीत.

पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश सह महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी जाहीरपणे एकमेकांची भेट घेतल्याचं, चर्चा केल्याची मागील काही महिन्यांमधील चित्र आहे. त्यामुळे आता नव्या राष्ट्रपती पदी कोण बसणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.