Shivsena On BJP: शिवसेनेचा आरोप, म्हणाले- मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
Uddhav Thackeray | (Facebook)

मुंबईला केंद्रशासित (Union Territory of Mumbai) प्रदेश बनवल्याचा आरोप करत शिवसेनेने (Shivsena) पुन्हा एकदा भाजप (BJP) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day 2022) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Samana) संपादकीयमध्ये फडणवीस यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची योजना केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याआधी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत वक्तव्य केले होते. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचे षडयंत्र रचले जात असून त्याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. आता पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून याचा उल्लेख केला आहे.

संपादकीयमध्ये शिवसेनेने लिहिले आहे की, आजही मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे कारस्थान पूर्णतः संपलेले नाही. त्यांना मुंबई या आर्थिक शहराचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे आहे आणि मुंबईचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करायचे आहे. याची पुरेपूर जाणीव देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील भाजपला आहे.

शिवसेनेने माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप करत म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वेगळी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयासमोर संपूर्ण योजनेचे सादरीकरणही केले आहे. विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आणि बिगर मराठी बिल्डरच्या सहकाऱ्यांच्या हाती संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे, असेही सामनामध्ये सांगण्यात आले. (हे देखील वाचा: CM Uddhav Thackeray on BJP: 'मी भोळा नाही धूर्त आहे', उद्धव ठाकरे यांचा भाजपला स्पष्ट इशारा)

एकीकडे आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो पण दुसरीकडे मुंबईला महाराष्ट्राच्या भूगोलापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे चांगले नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे मुंबईवरील नियंत्रण संपविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला.