CM Uddhav Thackeray on BJP: 'मी भोळा नाही धूर्त आहे', उद्धव ठाकरे यांचा भाजपला स्पष्ट इशारा
Uddhav Thackeray | (Facebook)

'सध्याची ही शिवसेना (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही', अशी टीका ही भाजप नेहमीत करतो. या टीकेला मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट उत्तर दिले आहे. 'आजची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही हे खरे आहे. माझे वडील भोळे होते. त्याचा फायदा घेऊन हिंदुत्त्वाच्या नावाखाली तुम्ही कसे त्यांना फसवले हे मी डोळ्याने पाहिले आहे. मी धूर्त आहे. तसे होऊ देणार नाही,' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला एक प्रकारे इशाराच दिला आहे. दैनिक लोकसत्ताच्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

भाजपवरील टीका कायम ठेवत मुख्यमंत्री म्हणाले, 'माझ्या वडीलांनीच माझ्या रक्ता हिंदुत्व भिनवले आहे. ते भोळे होते. भाजपने हिंदुत्वाच्या नावाखाली जे डाव साधले त्याकडे त्यांनी कानाडोळा केला. मी तसं करणार नाही'. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही कारभार करत आहोत. सरकार कुठे चुकत असेल तर आम्हाला सांगा. वाईट कारभार करत असू तर आम्हाला जनेसमोर उघडं पाडा. परंतू, नासकं, सडकं राजकारण करु नका. आता परत भाजपलाच विचारावेसे वाटते कुठे नेऊन ठेवली माझ्या महाराष्ट्राची संस्कृती. तुमच्या रक्ता सुडबुद्धी आलीच कशी?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray on Raj Thackeray: भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका)

दरम्यान, याच वेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या भोंग्यांच्या राजकारणावरुन जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या टीकेचा रोख मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नामोल्लेख टाळला असला तरी त्यांच्या बोलण्यातून रोख स्पष्ट होतो. 'शिवसेना ही आजही हिंदुत्त्ववादीच आहे. असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिले आहेत.'