
महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या भोंग्यांच्या राजकारणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या टीकेचा रोख मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नामोल्लेख टाळला असला तरी त्यांच्या बोलण्यातून रोख स्पष्ट होतो. 'शिवसेना (Shiv Sena) ही आजही हिंदुत्त्ववादीच आहे. असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिले आहेत.' लोकसत्ता या दैनिकाच्या एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' (CM Uddhav Thackeray On Raj Thackeray) असा 'सामना' रंगण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना ठासून सांगितले की, 'आपण हिंदुत्वाच्या या नव्या खेळाडूंकडे आपण कधी लक्षच देत नाही. हे लोक कधीतरी मराठीचा मुद्दा घेतात. मग इतरांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलण्याबाबत बोलतात. त्यानंतर मध्येच हिंदुत्त, भोंगे असे काही मुद्दे घेतात. असे भोंगेधारी आणि पुंगीधारी खूप पाहिले आहेत. आपल्या देशात हिंदू बहुसंख्याक आहेत. हे हिंदू वेगवेगळी भाषा बोलतात. हिंदू हा नासमज नक्कीच नाही. त्यामुळे आम्ही मराठी म्हणून इतरांना हाकलून द्यायचं. ते चाललं नाही की मग पुन्हा परत बोलवायचं. हे जेकाही चालले आहे त्याला माकडचाळे म्हणतात. ते लोकांना समजतात', असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, आव्हानात्मक परिस्थितीतही शेती, उद्योग-गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले - मुख्यमंत्री)
दरम्यान, यांना वेगवेगळे झेंडे का फडकवावे लागतात? असा सवाल उपस्थित करत आम्ही आमचा झेंडा कधीच बदलला नाही. जर अस्तित्व असेल ते टिकविण्याची गरज असते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी लागावला. जे आज उत्तर प्रदेशचे कौतुक करतात त्यानी कोरोना काळात गंगेत वाहिलेली प्रेतं, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तडफडून मेलेली बालकेही आठवावीत. असे असूनही ते जर प्रसिद्ध होणार असतील, लोकप्रिय होत असतील ती लोकप्रियता त्यांची त्यांना लखलाभ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
व्हिडिओ
भोंग्यांच्या मुद्द्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार भोंग्यांबाबत घालून दिलेले, नियम अटी या सर्वच धर्मांसाठी आहेत. त्यामुळे त्याचे पालन करायचे तर सर्वच धर्मियांना करावे लागणार आहे. जर हा मुद्दा देशाचा असेल तर केंद्र सरकारनेच त्याबाबत एक कायदा करायला हवा. नोटबंदी, जीएसटी याबाबत देशव्यापी निर्णय जसा घेतला तसाच निर्णय भोंग्यांबाबतही घेतला जावा, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.