शिवसेनेचे संसदेच्या बाहेर आंदोलन (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप मधील सत्तेचा वाद आता दिल्लीत सुद्धा दिसून येत आहे. आतापर्यंत शिवसेना एनडीएचा हिस्सा असून ही मोदी सरकाच्या विरोधात विधाने करत होती. तर आता अधिकृतपणे शिवसेना विरोधी पक्षाचा हिस्सा बनल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याच परिस्थितीत आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या मुद्द्यावरुन संसदेच्या बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव दिला आहे.

स्थगन प्रस्तावापूर्वी शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला. शिवसेनेने अशी मागणी केली आहे की, ज्या शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे त्यांना 25 हजार प्रति हेक्टर रुपये नुकसान भरपाई द्यावी. तर आतापर्यंत या नुकसान भरपाईची रक्कम 8 हजार रुपयेच आहे.(महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुंबई मध्ये शेतकर्‍यांचा एल्गार)

ANI Tweet:

रविवारी एनडीची बैठक हिवाळी संसद सुरु होण्यापूर्वी पार पडली. त्यावेळी शिवसेना पक्षाने या बैठकीला अनुपस्थिती दाखवली. तर आता शिवसेना अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडल्यानंतर विरोधी पक्षाच्या बाकांवर बसणार असल्याची माहिती देण्यात आली. लोकसभेत शिवसेनेचे 18 आणि राज्यसभेत एकूण 3 खासदार आहेत. तर महाराष्ट्रात 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर निकाल आल्यानंतर सुद्धा सरकार स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली.

तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सातारा व सांगली विभागातील पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी उद्धव साहेबांशी संवाद साधताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना धीर देताना ‘गरज लागल्यास हक्काने शिवसेनेना हाक मारा, आम्ही मदतीसाठी येऊ. तसेच लवकरच नुकसान भरपाईही मिळेल’ असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.