Maharashtra Farmers| Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि चार चक्रीवादळांनी मागील काही दिवसांपासून झोडपल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही हाता-तोंडाशी आलेल्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आज (14 नोव्हेंबर) मुंबईच्या रस्त्यांवर उतरला आहे. राजभवनावर शेतकर्‍यांनी मोर्चा काढत राज्यात लवकरात लवकर 'ओला दुष्काळ' जाहीर करावा अशी मागणी आंदोलक शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान या शेतकर्‍यांसोबत बच्चू कडू देखील रस्त्यांवर उतरले असून काही शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल लागूनही कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शेतकर्‍यांची व्यथा नेमकी कुणासमोर मांडावी? त्यांना नुकसान भरपाई मिळणार का? यासाठी शेतकरी अधिक आक्रमक होताना दिसलं आहे.

पहा शेतकर्‍यांचा राग

दरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ न दिल्याबद्दल राजू शेट्टी यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. 'राज्यपाल हे राजकीय पक्षाचे आमदार व नेत्यांना भेटतात. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही. मग दाद मागायची कुठे?' असा खडा सवाल देखील राजू शेट्टींनी विचारल्याचं मीडीया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.