देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन (Former President Pranab Mukherjee Passes Away) झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून तिव्र दु:ख व्यक्त होत आहे. यासोबतच प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचे राजकारणातील योगदान आणि अनेक आठवणींची चर्चा होत आहे. हा प्रसंग आहे राष्ट्रपती पद निवडणूक 2012 (Presidential Election 2012) मधील. या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख (Shiv Sena Chief) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि रालोआला (NDA) धक्का दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहकार्याने काँग्रेस (Congress) पक्षाचे धुरीण आणि प्रणव मुखर्जी यांनी हे समिकरण जुळवून आणले होते. काय होते हे समिकरण?
राष्ट्रपती पदासाठी 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांचे नाव काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निश्चित झाले. तशी घोषणाही झाली. युपीएने (संपुआ) प्रणव मुखर्जी यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात मैदानात कोणाला उतरावायचे? याबाबत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघडीत (एनडीए) संभ्रम होता. त्या वेळी एनडीए माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम आणि माजी लोकसभाध्यक्ष पी. ए. संगमा यांना मैदानात उतरवण्याच्या विचारात होते. पुढे पी. ए. संगमा हे एनडीएकडून प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात मैदानात उतरले. (याच पी. ए. संगमा यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.)
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाची मतं निर्णायक ठरणार होती. भाजपने राष्ट्रपती पदासाठी दिलेले उमेदवार पी. ए. संगमा हे बहुदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फारसे पसंत नव्हते. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांच्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी असे मत संपुआ नेत्यांमध्ये पडले. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे मन वळविण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर आली. (हेही वाचा, Former President Pranab Mukherjee Passes Away: माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात निधन)
राष्ट्रपती पद निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरु असतानाच एक दिवस राजकीयदृष्ट्या ऐतिहासीक अशी घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रणव मुखर्जी यांना घेऊन 'मातोश्री' या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. शरद पवार यांची भूमिका कामी आली. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. बाळासाहेब ठाकरे हे प्रणव मुखर्जी यांना प्रणवबाबू म्हणत असत. बाळासाहेबांनी प्रणवबाबू यांना पाठिंबा जाहीर केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. या वेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी होती. बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, शिवसेनेचा प्रणवबाबू यांना पाठिंबा आहे. राष्ट्रपती पदासाठी चाललेला खेळखंडोबा हा देशाच्या प्रतिमेसाठी योग्य नाही. केवळ राजकीय स्वर्थासाठी देशाची प्रतिमा चव्हाट्यावर मांडणे योग्य नव्हे. आजकाल ज्यांच्या आडात काहीच नाही तेही आपले पोहरे टाकून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहतात, असा टोलाही बाळासाहेब ठाकरे यांनी पी. ए. संगमा यांना लगावला होता. दरम्यान, 'हम सब एक है' हे जगाला दाखवून देण्यासाठी एकत्र या असेही शरद पवार यांनी म्हटले होते.