मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक: सट्टाबाजारात काँग्रेसची हावा; भाजपला धोक्याचा इशारा
भाजप, काँग्रेस (संग्रहित प्रतिमा)

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार आता निर्णायकी वळणावर येऊन ठेपला आहे. प्रसारमाध्यमं आणि अनेक संस्थांनी केलेल्या सर्व्हेतील विविध कल केव्हाच पुढे आले आहेत. अद्यापही अनेक संस्थांचे सर्व्हे सुरुच आहेत. अशातच सट्टा बाजारातला कलही प्रसारमाध्यमांच्या हाती आला आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगला आहे. या सामन्यात भोपाळच्या सट्टा बाजारामध्ये भाजपच्या तुलनेत काँग्रेसने बाजी मारल्याचे वृत्त आहे. या आधी मध्य प्रदेशात भाजपचेचे पारडे जड होते. मात्र, गेल्या काही दिवसांत परिस्थिती कमालीची बदलत आहे. या बदलत्या परिस्थितीचे पडसाद सट्टा बाजारात उमटत असल्याचे सांगितले जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळच्या सट्टा बाजारात गेल्या महिन्यात भाजपवर डाव लावण्यात येत होता. मात्र, आता हवा काँग्रेसच्या बाजूने आहे. सट्टेबाजांच्या हावल्याने दिलेल्या या वृत्तात एक महिन्यापूर्वी जर कोणी भाजपवर १० हजार लावत असेल तर, त्याला ११ हजार मिळत होते. तर, कोणी काँग्रेसवर ४४०० रुपये लावले तर, त्याला १० हजार रुपयांचा परतावा देऊ केला जात होता. आता स्थिती बदलली आहे. आता कोणता पक्ष सरकार बनवेल यावर सट्टा लावला जात नाही. तर, कोणता पक्ष किती जागा जिंकेल यावर सट्टा लावला जाऊ लागला आहे. कारण, सट्टाबाजारातील अभ्यासूंना वाटते की, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळणार नाही. त्यामुळे कोणता पक्ष सरकार बनवेल यावर सट्टा लावण्यास अनेक मंडळी इच्छुक नाहीत.

दरम्यान, प्रसारमांध्यमं आपल्या वृत्तात सांगत आहेत की, सट्टा बाजार काँग्रेसकडे झुकलेला पाहायला मिळत आहे. २३० जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११६ तर भाजपला १०२ जागा मिळण्याचे भाकीत जाणकार वर्तवत आहेत. दुसऱ्या बाजूला राजस्थान आणि छत्तीसगढबाबत सावध पवित्रा व्यक्त होताना दिसतो आहे. (हेही  वचाा,'हे बघ भाऊ! तुला मत द्यायचे असेल तर दे, नाहीतर नको'; विकासाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराची भंबेरी (व्हिडिओ))

अर्थात सट्टा बाजार हा बेकायदेशीर आहे. त्यामुळे या प्रकारावर पोलिसांची बारीक नजर असते. खास करुन निवडणूका आणि क्रीडा सामन्यांवेळी. सट्टा खेळताना आढळलेल्या दोषींव पोलीस कडक कारवाईही करतात. पण, तरीसुद्धा सट्टाबाजार चोरीचुपके सुरुच असतो.