'हे बघ भाऊ! तुला मत द्यायचे असेल तर दे, नाहीतर नको'; विकासाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराची भंबेरी (व्हिडिओ)
मध्यप्रदेशमध्ये भाजप, काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर (Archived images)

मध्यप्रदेश निवडणुकीत सत्ताधारी भाजपला या वेळचा सामना वाटतो तितका सोपा नसल्याचे चित्र आहे. गेली पंधरा वर्षे शिवराजसिंग चौहाण सरकारच्या रुपात सत्तेत असलेल्या भाजपला जनता जाब विचारु लागली आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारताच भाजप उमेदवारांचीही चांगलीच भंबेरी उडताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात भाजप उमेदवार माधव सिंह डावर यांच्या जनसभेतही असाच प्रकार पाहायला मिळाला. भरसभेत एका युवकाने डावर यांच्यावर विकासाच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती केली. सुरुवातीला डावर यांनी सरकारच्या वतीने लंगडे समर्थन केले. पण, युवकाचे प्रश्न पाहून अखेर ते हताश झाले आणि त्यांनी 'हे बघ भाऊ! तुला मत द्यायचे असेल तर दे नाहीतर नको. मला पक्षाने तिकीट दिले आहे', असे म्हटले.

माधव सिंह डावर हे आपल्या मतदारसंघात रविवारी प्रचार करत होते. प्रचारार्थ त्यांनी जनसभेचे आयोजन केले. दरम्यान, मतदारसंघातील मतदार आणि नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन त्यांना खडसाऊन जाब विचारला. या वेळी मतदार आणि माधव सिंह डावर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. डावर यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, तो असफल झाला. जनतेचा उद्रेकच इतका तीव्र होता की, डावर यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माघार घ्यावी लागली. डावर यांची खरी पंचायत झाली ती, एका तरुणाने त्यांच्यावर विकासाच्या मुद्द्यावरुन केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर.

माधव सिंह डावर हे जनसभेला संबोधीत करत असताना एक युवक पुढे आला आणि त्याने, 'तुम्ही नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिले होते. तर, मग नोकऱ्या कुठे आहेत. इतकी वर्षे ग्रामीण नागरिक आणि आदिवासी युवक तुमच्या पाठीशी राहिले. पण, त्यांच्या रोजगार, शिक्षण आणि विकासासाठी तुम्ही काय केले?. मतदारसंघातील अनेक शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक आहे. तोही शिकवण्यासाठी फार इच्छुक असत नाही. आम्ही बेरोजगार आहोत. मग, तुमच्या कार्यकाळात तुम्ही काय केले?', असा अशी प्रश्नांची मालिकाच या युवकाने विचारली. यावर डावर काहीच बोलू शकले नाहीत. अखेर त्यांनी 'हे बघ भाऊ तुला वाटत असेल तर, मत दे, अन्यथा देऊ नकोस', असे उद्गार काढले. (हेही वाचा, भाजप आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार, व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, माधव सिंह डावर हे भाजपचे उमेदवार आहेत. या आधी ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. या वेळी भाजपने त्यांना जोबात मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या आधी ते २००३ आणि २०१३ मध्ये इथून निवडून आले आहेत. २००८ साली सुलोचना रावत यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ते ५६ वर्षांचे आहेत.