काँग्रेस-भाजप (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक, India tv cnx opinion poll: मध्य प्रदेशमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, राजकीय पक्षांनी आखलेल्या रणनितीप्रमाणे कामगिरी पार पडेल यावर अधिक भर दिला आहे. या वेळी मध्यप्रदेशमध्ये काय निकाल लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजपसमोर काँग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे. गेली 15 वर्षे इथे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. त्यातच केंद्रातही भाजपचे सरकार आहे. देशातील राजकीय स्थितीवर नजर टाकता, 2014 नंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये भाजपच्या विजयाचा वारु चौखूर उधळला आहे. तर, काँग्रेसला अपवाद वगळता सपाटून मार खावा लागला आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर देशातील वातावरण बदलल्याच चित्र आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचा निसटता पराभव झाला. तर, कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा विजयरथच रोखला. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना महत्त्व आले आहे. त्यातच या राज्यांतील निवडणुकांकडे 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळे विविध संस्थांनी मध्यप्रदेशमध्ये जनमत चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्यांतील अंदाज भाजपसाठी सध्या तरी धोक्याचा इशारा देणारे तर, काँग्रेसला हात देणारे आहेत.

इंडिया टीव्ही-CNX च्या ओपिनियन पोलमध्ये भाजपसाठी धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. इंडिया टीव्ही-CNX ने केलेल्या जनमत चाचणीचा अंदाज हा काँग्रेसला अच्छे दिन तर भाजपवर पराभवाची छाया असल्याचे सांगतो. इंडिया टीव्ही-CNX ने मध्यप्रदेशमध्ये केलेल्या पहिल्या जनमत चाचणीत भाजपला 128 तर, काँग्रेसला 85 जागा मिळण्याची शक्याता व्यक्त केली होती. तर, याच संस्थेने नुकत्याच केलेल्या ताज्या सर्व्हेमध्ये भाजपला 122 तर काँग्रेसला 95 जागा मिळू शकतील असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्व्हेमध्ये दिलेल्या आकडेवारीचा विचार करु पाहता सत्ताधारी भाजपला 6 जागांचे नुकसान तर, काँग्रेसला 10 जागांवर फायदा मिळत असल्याचे दिसते. (हेही वाचा, भाजपप्रणीत एनडीएला रोखण्यासाठी सेक्युलर पक्षांनी एकत्र यावे, काँग्रेसने मदत करावी)

मध्य प्रदेशमध्ये गेली 15 वर्षे भाजपची सत्ता आहे. या राज्यात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. या जागांसाठी निवडणुका होत असून, येत्या 28 नोव्हेंबरला मतदान पार पडत आहे. विद्यमान विधानसभेत भाजपचे सरकार पूर्ण बहुमताचे सरकार असून त्याचे नेतृत्व शिवराजसिंह चौहाण करत आहेत.