भाजपप्रणीत एनडीएला रोखण्यासाठी सेक्युलर पक्षांनी एकत्र यावे, काँग्रेसने मदत करावी; चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीनंतर देवेगौडांचे अवाहन
माजी पंतप्रधा एच डी देवेगौडा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यात 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा (संग्रहित, संपादित प्रतिमा)

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी करण्यासाठी प्रयत्न करणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांची भेट घेतली. भेटीदरम्यान झालेल्या चर्चेवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामीही उपस्थित होते. या चर्चेनंतर देवेगौडा यांनी सांगितले की, एनडीए सरकारच्या काळात वैधानिक संस्था धोक्यात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी आणि देश वाचविण्यासाठी सेक्युलर विचारांच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. देशातील महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस भलेही 17 राज्यांमध्ये निवडणुका पराभूत झाला असेल. पण, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली असेन. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने भाजपविरोधी मोहिमेत नायडू यांची मदत करावी, असेही देवेगौडा यांनी म्हटले. तर, चंद्राबाबू नायडू यांनी राफेल डील आणि नोटबंदीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

कर्नाटकमध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि जेडी(एस) मोठ्या मधाधिक्याने विजयी झाले. तर, भाजपचा सपाटून पराभव झाला. या निवडणूक निकालानंतर तेलुगु देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी एच डी देवेगौडा यांची भेट घेतली. भाजपविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट नुकतीच घेतली होती.

देवेगौडा यांच्या भेटीनंतर चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, एनडीए सरकाची धोरणे देशासाठी अत्यंत धोकादायक आणि तितकीच नुकसान करणारी आहेत. त्यामुळे सेक्युलर विचारांच्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने यात महत्त्वाचे योगदान द्यायला हवे. ही काँग्रेसची जबाबदारी असल्याचेही चंद्राबाबूंनी म्हटले आहे. (हेही वाचा, 'काँग्रेस, जेडीएसचा विजय! हे तर जनतेकडून दिवाळी गिफ्ट', कर्नाटक पोटनिवडणूक निकालानंतर सिद्धारमैय्या यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, भाजप सरकारच्या काळात प्रत्येक वैधानिक संस्था धोक्यात आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे त्या त्या राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांना खच्ची करण्यासाठी जाणीवपूर्वक सुड भावनेने प्रयत्न केले जात आहेत. या सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्थाही कमालीची घसरली आहे, असा आरोपही चंद्राबाबूंनी केला.