सिद्धारमैय्या, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कर्नाटक (Photo Credits: Facebook)

आगामी काळात (२०१९) होणाऱ्या लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना सत्ताधारी भाजपला जोरदार फटका बसला आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. नाही म्हणायला एका जागेवर भाजपचा उमेदवार निवडणून आला खरा. मात्र, भाजपचा हा विजय पराभवातच झाकोळून गेला. जामखंडी आणि बेल्लारी काँग्रेसने खिशात टाकला आहे. तर, रामनगर आणि मांड्या मतदारसंघात जेडी(एस)ने आपला झेंडा फडकावला आहे. त्यामुळे इतका दणदणीत विजय मिळाल्यावर काँग्रेस आणि जेडी(एस)च्या गोटातून प्रतिक्रिया आली नसती तरच नवल. प्रसारमाध्यमांनी काँग्रेसची प्रतिक्रिया जाणून घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारमैय्या म्हणाले की, पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस, जेडीएसचा विजय हे जनतेने दिलेले दिवाळी गिफ्ट आहे. जनतेने भाजपला नाकारुन पुन्हा एकदा भाजपवरच विश्वास दाखवला आहे, हेही या निवडणुकांतून पुढे आल्याचे सिद्धारमैय्या म्हणाले.

पुढे बोलताना सिद्धारमैय्या म्हणाले, 'बेल्लारी येथे महाआघाडीचा विजय नक्की होता. काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न ज्या लोकांनी पाहिले त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. लोकांनी भाजपला नाकारले आहे. हा विजय हा काँग्रेससाठी दिवाळीचे गिफ्ट आहे.' माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दावा केला की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस २० हून अधिक जागा जिंकेन. सोबत सिद्धारमैय्या असेही म्हणाले की, काँग्रेससाठी ही पुनर्संजीवनी आहे. (हेही वाचा, कर्नाटक पोटनिवडणूक निकाल: भाजपला धक्का, काँग्रेस, जेडीएस बहुमताने विजयी; २०१९साठी कमळ धोक्यात, हात 'अच्छे दिन'च्या तयारीत)

दरम्यान, काँग्रेस नेते डी शिवकुमार यांनीही कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले आहेत. हा विजय म्हणजे जनतेने भाजपला दिलेले उत्तर आहे. पोटनिडणुकीत आम्हीच विजयी होणार असा दावा भाजप निवडणुकीपूर्वीच करत आला होता. आम्ही सर्व जनतेचे आभार मानतो. द्यांनी काँग्रेसला भरभरुन मते दिली.कर्नाटकच्या जनतेने भाजपला स्पष्ट आपला संदेश दिला आहे. जनतेने भाजपला जागा दाखवली. खास करुन बेल्लारी मतदारसंघ हा भाजप नेते श्रीरामलून यांचा गढ म्हणून ओळखला जातो. पण, हा गडही भाजपला राखता आला नाही. बेल्लारी मतदारसंघातून श्रीरामलू यांची बहीण शांता या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या. दरम्यान, शांतीपूर्ण मतदान केल्याबद्धल जनतेचे आभार असा टोलाही शिवकुमार यांनी या वेळी लगावला.