Madhya Pradesh assembly election 2018: सद्यास्थितीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. खास करुन मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. तर, मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्लाच म्हणून ओळखला जातो. या राज्यात शिवराजसिंह चौहाण यांच्या रुपात भाजप गेली १५ वर्षे सत्तेत ठाण मांडून आहे. यंदा मात्र या बालेकिल्ल्याला काहीसे हादरे बसताना दिसत असून, भाजपचा प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेसचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांची कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवराज सिंह चौहाण उमेदवारी करत असलेला बुधनी विधानसभा मतदारसंघही धोक्यात असल्याचे चित्र आहे.
शिवराज सिंह चौहाण यांच्यासमोर काँग्रेस उमेदवाराचे तगडे आव्हान
मध्य प्रदेशमध्ये येत्या २८ नोव्हेंबरला मतदान पार पडत आहे. दरम्यान, मतदानापूर्वी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपापली रणनिती अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. यात काँग्रेसने भाजप प्रणित शिवराज सिंह चौहाण सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, स्वत: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाणसुद्धा काँग्रेसला जोरदार प्रत्त्युत्तर देताना दिसत आहेत. पण, प्रसारमाध्यमांतून आलेले ग्राउंड रिपोर्ट काही भलतेच चित्र दाखवत आहेत. जे शिवराज सरकारसाठी फारसे अनुकुल नाहीत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिवराज यांच्या बुधनी मतदारसंघातही यांच्यासाठी अटीतटीचा समाना पाहायला मिळत आहे. राजकीय अभ्यासक सांगतात की काँग्रेसने बुधनी मतदारसंगात तगडा उमेदवार देऊन शिवराज यांच्यासमोरील आव्हान अधिक तगडे केले आहे.
काँग्रेसचे अरुण यादव देतायत शिवराज सिंह यांना टक्कर
मुख्यमंत्री शिवराज यांना त्यांच्याच मतदारसंघातून घेरण्यासाठी काँग्रेस आणि राजकीय वर्तुळातून प्रयत्न सुरु आहेत. शिवराज सिंह चौहाण यांच्या विरोधात काँग्रेसने या वेळी अरुण यादव या तडफदार नेत्याला मैदानात उतरवले आहे. अरुण यादव हे मध्य प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे तगडे नेते अशी ओळख असलेल्या सुभाष यादव यांचे पुत्र आहेत. सुभाष यादव हे १९९३ पासून २००८ पर्यंत कसरावद मतदारसंघातून आमदार म्हणून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते. सध्या ते विधानसभा सदस्य नाहीत. पण, ते दोन वेळा लोकसभा निवडणुक जिंकले आहेत आणि पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच घेतला निर्णय
दरम्यान, बुधनी विधानसभा मतदारसंघातून शिवराज यांच्या विरोधात अरुण यादव यांना उतरवण्याचा निर्णय स्वत: राहुल गांधी यांनी पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांच्या सहमतीने घेतला होता. अरुण यादव हे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. बुधनी मतदारसंघात काँग्रेसने २०१३मध्ये शशांक भार्गव यांना मैदानात उतरवले होते. या वेळी भार्गव यांना ५६८१७ तर, चौहाण यांना ७३७८३ मते मिलाली. परिणामी शिवराज १६९६६ मतांनी विजयी झाले. पण, हा विजय अगदीच निसटता होता. त्यामुळे चौहाण यांना त्यांच्याच मतदारसंघात धूळ चारता येऊ शकते असा आत्मविश्वास काँग्रेसच्या मनात निर्माण झाला. या वेळी काँग्रेसने तगडा उमेदवार मैदानत उतरवला. (हेही वाचा, मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक: भाजपला विजय सोपा नाही, काँग्रेसला 'अच्छे दिन'चा योग; जनमत चाचण्यांचा अंदाज)
शिवराज सिंह यांच्या बुधनीतील राजकीय वातावरण
राजकीय अभ्यासक सांगतात की, शिवराज यांना यंदाचा विजय सहज सोपा नाही. विजय मिळवण्यासाठी बुधनीमध्ये त्यांना अधिक ताकद लाऊन काम करावे लागेल. अरुण यादव यांच्याप्रमाणेच शिवराज यांचे विरोधक असलेल्या अर्जुन आर्य यांनीही मतदासंघात जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. सपातून काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झालेल्या अर्जुन आर्य यांना भलेही पक्षाने तिकिट दिले नाही. पण, बुधानीतील काही परिसरांमध्ये आर्य यांनी लक्षवेधी दबाव आणि प्रभावगट निर्माण केला आहे. ज्याचा फायदा काँग्रेस उमेदवार असलेल्या अरुण यादव यांना होऊ शकतो.
शिवराज सिंह यांची धुरा चिरंजीवांच्या खांद्यावर
शिवराज सिंह हे अर्थातच मध्य प्रदेश भाजपचे स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना संपूर्ण राज्याकडे लक्ष द्यावे लागणार. त्यामुळे बुधानीकडे पूर्णवेळ लक्ष देणे त्यांना काहीसे कठीण जाणार हे वास्तव आहे. त्यामुळे बुधनीमध्ये शिवराज यांच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी त्यांचे चिरंजीव कार्तिकेय यांच्या खांद्यावर आहे. तसेच, शिवराज यांच्या पत्नी साधना सिंह यासुद्धा शिवराज यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, निवडणूक प्रचार सुरु झाला तेव्हा आपण, राज्यातील २२९ मतदारसंघात प्रचार करणार आहोत. त्यामुळे खास प्रचारासाठी बुधनीला येणार नाही, असे शिवराज यांनी स्पष्ट केले होते. बुधनी हा आपलाच मतदारसंघ आहे. त्यामुळे आपले लोक आपल्या पाठीशी ठाम उभे राहतील असा होरा होता. पण, बुधनीतील परिस्थिती काही वेगळेच दिसते आहे. शिवराज यांच्या प्रचारासाठी आलेल्या पत्नी आणि चिरंजिवांना जनता प्रस्न विचारत आहे. त्याबाबतचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आपले घरचे मैदान राखण्यासाठी शिवराज सिंह चौहाण पुन्हा एकदा बुधनी विधानसभा मतदारसंघात येणार का? याबाबत उत्सुकता आहे.