Karnataka Assembly Bypoll Results 2019: कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक निकाल, भाजप सरकारचे भवितव्य टांगणीला, काँग्रेस, जेडीएस पक्षाच्या आशा पल्लवीत
B. S. Yediyurappa | (Photo Credit: Facebook)

Karnataka Assembly Bypoll Results 2019: कर्नाटक विधानसभा पोटीनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज (9 डिसेंबर 2019) मतमोजणी पार पडत आहे. एकूण 15 विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक पार पडली होती. 224 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभा (Karnataka Assembl) सभागृहातील तब्बल 17 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर या ठिकाणी फेरनिवडणूक लागली होती. मोठ्या नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींनंतर कर्नाटक राज्यात सत्तेवर आलेल्या येदियुरप्पा (B. S. Yediyurappa) प्रणीत भाजप (BJP) सरकारचे भवितव्य पोटनिवडणुकीच्या आजच्या निकालावर अवलंबून असणार आहे. पोटनिवडणूक पार पडलेल्या एकूण 15 जागांपैकी किमान 6 जागांवर विजय मिळवणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

विधानसभा अध्यक्षांनी सुमारे 17 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर कर्नाटक विधानसभेतील एकूण सदस्य संख्याबळ 207 इतके राहिले होते. परिणामी बहुमतासाठी 104 हा आकडा निर्णायक होता. त्यानंतर भाजपने एका अपक्षाच्या मदतीने बहुमतासाठी आवश्यक असणार आकडा पार करत 105 अशी आघाडी घेतली. मात्र, भाजपचे हे बहुमत अल्पमतातील आहे. त्यामुळे बहुमताचा पूर्ण आकडा गाठायचा तर भाजपला आणखी 6 जागांची आवश्यकता आहे.

पोटनिवडणूक पार पडलेले विधानसभा

अठानी, कगवाड, गोकक, येलापुर, हिरेकेरूर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरा, यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआऊट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर या मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. तर, मुसकी (राइचुर जिल्हा) आणि आर.आर. नगर (बंगळुरु) येथील पोटनिवडणुकीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विधानसभा निवडणूक मे 2018 मध्ये आलेल्या मतमोजणी निकालावर दाखल असलेल्या खटल्यामुळे न्यायालयाने या ठिकाणी निवडणुकीवर स्थिगिती दिली आहे. (हेही वाचा, Karnataka Assembly Bypolls 2019: येदियुरप्पा सरकारची परीक्षा; भाजपची प्रतिष्ठा पणाला; 15 पैकी 8 जागा तर जिंकाव्याच लागणार)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा आकडा 105 इतका सर्वाधिक असतानाही भाजपला सत्तास्थापनेपासून दूर रहावे लागले. भाजपने चलाखी करत सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने भाजप तोंडावर पडला. त्यामुळे अल्पमतात असलेला सत्तेचा गड बहुमतात आणून भक्कम करणे हे भाजपचे पहिले लक्ष आहे. तर, दुसऱ्या बाजूला हातून निसटलेला सत्तेचा सारिपाट पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस प्रयत्नशिल आहेत. कर्नाटक निवडणूक वेगवेगळे लढल्यानंतर एकत्र येत काँग्रेस-जेडीएस असे सरकार सत्तेवर आले होते. मात्र, अल्पावधीत ते सरकार कोसळले आणि भाजप सरकार सत्तेवर आले. त्यामुळे पोटनिवडणुकीत जनता कोणाला कौल देते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.