नवी दिल्ली: काल म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) 'एक शाम शहीदो के नाम' नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार हंस राज हंस (Hans Raj Hans) आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजपाचे खासदार हंस राज हंस यांनी एक भलतीच मागणी केल्याचे समोर येत आहे. हंसराज यांनी जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द केल्याचा आनंद व्यक्त करताना JNU चे नाव बदलून नरेंद्र मोदी विद्यापीठ (Narendra Modi) करण्यात यावे, जेणेकरून देशात मोदींच्या नावावर देखील काहीतरी असले अशी इच्छा आपल्या भाषणातून व्यक्त केली.
प्राप्त माहितीनुसार, भाजपा खासदार आणि प्रसिद्ध गायक हंस राज यांनी आपल्या भाषणातून देशाच्या फाळणीसाठी आणि काश्मीरच्या प्रश्नासाठी जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरून ताशेरे ओढले. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकीची शिक्षा आपण आजपर्यंत भोगत आहोत मात्र कलम 370 रद्द करून आज नरेंद्र मोदींनी हा प्रश्न सोडवला आहे त्यामुळे मोदींच्या नावावरही या देशात काहीतरी असायला हवं, असे म्हणत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव बदलून मोदी नरेंद्र विद्यापीठ ठेवायला हवं'. अशी मागणी केली आहे. तसेच यापुढे तरी काश्मीर मध्ये शांतता नांदावी, बॉम्बस्फोट होऊ नयेत, भारत मातेचा एकही पुत्र शहीद होऊ नये' अशी आशा ही हंसराज यांनी व्यक्त केली.
ANI ट्विट
#WATCH Delhi: BJP's Hans Raj Hans speaks in JNU on Article 370 abrogation. Says "Dua karo sab aman se rahein, bomb na chale...Hamare buzurgon ne galatiyan ki hain hum bhugat rahe hain...Main kehta hoon iska naam MNU kar do, Modi ji ke naam pe bhi to kuch hona chahiye..." (17.08) pic.twitter.com/gejRVIXhZa
— ANI (@ANI) August 18, 2019
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 हटवल्यावर मोदी सरकारच्या निर्णयावर राष्ट्रीय व जागतिक स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत होत्या. काल, यासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही एक खास बंद खोलीत चर्चा घडली होती. या निर्णयानंतर खवळलेल्या पाकिस्तानने काश्मीर प्रश्नी चीनची मदत मागून हा मुद्दा जागतिक स्तरावर घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र भारताने यामध्ये आपला अलिप्त राहण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.