Papua New Guinea Landslide: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनात झालेल्या 670 नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्याशिवाय, जखमी नागरिक लवकरात लवकर बरे होण्याची अशा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट केली. भारताकडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल यावर त्यांनी भर दिला. (हेही वाचा:Papua New Guinea landslide: पापुआ न्यू गिनी भूस्खलनात 2,000 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे संयुक्त राष्ट्रांना मदतीच्या मागणीचे पत्र)

"पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे तेथे मोठी जीवितहानी झाली आहे. मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पीडित कुटुंबांप्रती आमची मनःपूर्वक संवेदना आहे आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी भारत प्रार्थना करतो. भारत शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे," असे पंतप्रधान मोदींनी X वर म्हटले.

शुक्रवारी उत्तर पापुआ न्यू गिनीच्या पर्वतीय एन्गा प्रदेशात भूस्खलनाची घटना घडली.सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या भूस्खलनात 670 नागरिकांचा बळी गेला. शिवाय, भूस्खलनात सुमारे 2000 लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारती आणि अन्नधान्य, पिके,फळबागांचे मोठे नुकसान झाले. देशाच्या आर्थिक जीवनरेषेवर मोठा परिणाम झाला," असे राष्ट्रीय आपत्ती केंद्राचे कार्यवाहक संचालक लुसेटे लासो माना यांनी एका पत्रात म्हटले आहे.

"पापुआ न्यू गिनी येथे अजूनही परिस्थिती अस्थिर आहे. तेथे अजूनही काही ठिकाणी भूस्खलन होत आहे. ज्यामुळे बचाव पथकाला कार्यात अडथळे निर्माण होत आहेत," असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यांबळी गावातील 150 हून अधिक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.