BJP Leader Vineet Agarwal (PC - ANI)

दिवसेंदिवस भाजप नेत्याची वक्तव्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. भाजप नेते विनीत अग्रवाल (BJP Leader Vineet Agarwal ) यांचा दिल्ली प्रदूषणाबाबतीत एक जावई शोध लावला आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकरी तण जाळत असल्याने दिल्लीतील हवा प्रदूषित होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही राज्यांमधील सरकारला चांगलेच सुनावले होते. परंतु, आता भाजप नेते विनीत अग्रवाल यांनी दिल्लीतील हवेच्या प्रदूषणासाठी 'चीन' आणि 'पाकिस्तान'ला जबाबदार धरलं आहे. अग्रवाल हे भाजपाच्या व्यापार विभागाचे संयोजक आहेत. त्यांनी याअगोदरही अशी वादग्रस्त विधानं केली आहेत. (हेही वाचा - जे लोक गोमांस खातात त्यांनी श्नानाचंही मांस खावं; भाजप नेते दिलीप घोष यांचे वादग्रस्त वक्तव्य)

काय म्हणालेत विनीत अग्रवाल ?

भारताला घाबरवण्यासाठी आपल्या शेजारील देशाने विषारी वायू सोडला असावा. त्यामुळे दिल्लीतील हवा प्रदूषित झाली असावी. हा विषारी वायू पाकिस्तान आणि चीन सोडला असावा, असं भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. पाकिस्तान भीक मागण्यासाठी कटोरा घेऊन जगभर फिरत आहे. भारताचे नुकसान व्हावं यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाब आणि हरयाणातील शेतकरी या आधीदेखील तण जाळत होते. परंतु, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत नव्हते. त्यामुळे या प्रदूषणाला शेतकरी आणि उद्योगधंदे चालवणाऱ्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. देशाच्या विकासात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे, असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

एएनआय ट्विट - 

प्रदूषणामुळे सामान्यांची चिंता वाढली असताना भाजपचे नेते मात्र काहीही बरळताना दिसत आहेत. भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली शहरातील प्रदूषणाबाबत पत्र लिहिले होते. यात त्यांनी दिल्ली शहरावर एअर फोर्सची विमाने वापरून पाण्याचा मारा करावा, अशी मागणी केली होती. तसेच भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केलं होतं. 'जे सुशिक्षित लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी श्वानाचे मांस खावं. ते आरोग्यासाठी चांगलं असतं', असं खळबळजनक वक्तव्य घोष यांनी केलं होतं.