BJP West Bengal President Dilip Ghosh (PC- ANI)

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (BJP West Bengal President Dilip Ghosh) सध्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. 'जे सुशिक्षित लोक रस्त्यावर गोमांस खातात त्यांनी श्वानाचे मांस खावं. ते आरोग्यासाठी चांगलं असतं', असं खळबळजनक वक्तव्य घोष यांनी केलं आहे. बर्दवानमध्ये गोप अष्टमीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात घोष बोलत होते.

घोष यांनी फक्त श्वानच नाही, तर आणखी प्राणी आहेत त्यांचंही मांस खा. तुम्हाला कोणी अडवलं आहे? गाय आपली माता आहे, त्यामुळे गायीला मारणं असामाजिक आहे. अनेक लोक आपल्या घरामध्ये विदेशी श्वान पाळतात. या श्वानाचे मलमूत्रदेखील ते साफ करतात. हे करणं मोठा अपराध आहे, असंही घोष यांना यावेळी म्हटलं आहे.

एएनआय ट्विट - 

नेमकी काय म्हणालेत दिलीप घोष ?

भारतात गायीचे स्थान पवित्र आहे. त्यामुळे भारतात गायीविषयी सन्मान आणि आदराची भावना आहे. भारतात गायीच्या दूध पिऊन मुलं जगतात. गाय आपली आई आहे. त्यामुळे तिला कोणी मारलं तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावाही घोष यांनी केला. यावेळी घोष यांनी देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली आहे. विदेशी गाय नाही, तर फक्त देशी गाय आपली 'आई' आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. त्यांची परिस्थितीत सध्या कठिण आहे, असा टोलाही घोष यांनी यावेळी लगावला आहे.

हेही वाचा - भाजपच्या 'रामा'कडून पुन्हा एकदा वादग्रस्त 'कदम'; मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी हमर, बेन्टलीचे आमिष

सध्या भाजपचे अनेक नेते वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांवर 'जादू-टोणा' आणि 'मारक शक्ती'चा प्रयोग करत आहेत. त्यामुळेच एकानंतर एक भाजप नेते जगाचा निरोप घेत आहेत. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं होतं.