आमदार राम कदम ((Photo Credit: ANI)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार राम कदम हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात मुलींना पळवून आणण्याचे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर निर्माण झालेला वाद संपतो न संपतो तोपर्यंत कदमांनी पुन्हा एकदा नवे वक्तव्य केले आहे. राम कदम यांनी १८ वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवा. तुम्हाला हमर, बेन्टलीतून फिरवतो, असे म्हटले आहे. कदमांच्या या वक्तव्यातून त्यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप केला जात आहे. राम कदम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राम कदम यांनी हे वक्तव्य केले आहे.

पहिल्यांदा मी सन २००० मध्ये निवडून आलो. त्यावैळी जी मुलं-चौथी पाचवीत होती. त्या सर्व मुलांनी आता वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. या सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदवा. मी तुमची महागड्या गाड्यांतून फिरण्याची इच्छा पूर्ण करतो. तुम्ही जर मतदार यादीत नाव नोंदले तर, तुम्हाला हमर, बेन्टली या महागडया गाडयांमधून फिरवून आणीन. शाहरुख खान, सलमान खान, वरुण धवन, रणवीर सिंह या अभिनेत्यांबरोबर तुमची भेट घडवून आणीन तसेच तुम्हाला तिरुपती बालाजी यात्रेला घेऊन जाईन. तुम्हाला मोटारसायकल, फोर व्हिलर शिकायची आहे तर, तीसुद्धा तुम्हाला मोफत शिकवली जाईल, असेही आमित राम कदम यांनी दाखवले आहे.

दरम्यान, राम कदम यांनी मतदारांना आमिष दाखवले पण, 'व्हिडिओच्या शेवटी या सर्व गोष्टींमागे तुम्हाला प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं हा उद्देश आहे. या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिलेल्या देशात प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदवलंच पाहिजे असं सांगायलाही राम कद विसरले नाहीत'.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'भाजपा आमदार राम कदम यांचा नवीन प्रताप' या अशी पोस्ट लिहून शेअर केला आहे. आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये, भाजपा आमदार राम कदम यांचा नवीन प्रताप. तुम्ही नवीन मतदार नोदणी करा व माझ्या कार्यालयाला कळवा...तिरूपती यात्रा , लोकप्रिय अभिनेत्यांसोबत फोटो काढून देणार , महागड्या गाड्या मध्ये फिरवणार आमिष मतदारांना मतदार होण्यासाठी मग निवडुन येण्यासाठी.?, असा सवाल विचारला आहे.