Coronavirus (Photo Credit: IANS)

कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron) प्रकार जगभरात वेगाने वाढत आहे. मंगळवारी एकीकडे अमेरिकेत या संसर्गामुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली, तर भारतात संक्रमितांची संख्या 202 वर पोहोचली. आज दिल्लीत सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. आता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ओमायक्रॉन विषाणूविरूद्ध इशारा दिला आहे. भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा प्रकारापेक्षा कमीत कमी तीनपट जास्त संसर्गजन्य आहे. म्हणून, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर त्वरित प्रतिबंधात्मक कारवाईची आवश्यकता आहे.

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन या कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. या व्हेरिएंटचे भारतासह इतर अनेक देशांमध्ये रुग्ण नोंदवले गेले आहेत. यासंदर्भात शासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ओमायक्रॉन या नवीन प्रकाराबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहित, प्रतिबंध, तपासणी आणि कोरोना लसीकरणाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नाईट कर्फ्यू लागू करणे, मोठ्या मेळाव्याचे कठोर नियमन, विवाहसोहळा आणि अंत्यसंस्कार कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या कमी करणे, चाचण्या आणि पाळत ठेवणे यासारखे धोरणात्मक निर्णय लागू करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाचे नवीन रूप पाहता महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने आज संध्याकाळी बैठक बोलावली होती.  एक दिवसापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घोषणा केली होती की, दक्षिण आफ्रिकेतील देशांतून आलेल्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल.

महाराष्ट्र सरकारने कोरोनासाठी तयार केलेल्या टास्क फोर्सने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याचा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी, अशीही महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज आणखी 11 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आजपर्यंत, राज्यात ओमायक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या एकूण 65 रुग्णांची नोंद झाली आहे.