
दुसऱ्या दिवशीही देशातील दोन सर्वात महत्वाची शहरे मुंबई आणि दिल्ली येथे ओला आणि उबरच्या चालकांचा संप चालूच असल्याचे दिसत आहे. आजही ओला आणि उबरच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसत नाहीत. यामुळे रेल्वे आणि बसचा आधार घेत चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरातील काही भागांत ओला आणि उबरची सेवा चालू आहे. मात्र यासाठी जे दर आकारले जात आहेत ते अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत.
आपल्या विविध मागण्यांसाठी ओला आणि उबरचे चालक कालपासून संपावर आहेत. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानंतरही ड्रायवरला इतर भाड्यापेक्षा कमी भाडे दिले जाते. ओला उबर व्यवस्थापनाने चालकांसोबत सुरुवातीला जे करार केले होते त्याच पालन केले नाही, म्हणून हा संप पुकारला गेला आहे. मात्र व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर बेमुदत संप करण्याचा इशारा ओला उबर चालकांनी दिला आहे.
ओला आणि उबरच्या अधिकाऱ्यांनी या संपावर गेलेल्या चालकांशी बोलणे चालू असल्याचे सांगून, मंगळवारी जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर धावतील असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनतरी याबाबत कोणतीही ठोस पावले कंपनीकडून उचलण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुर्ला पश्चिम येथील उबर कार्यालयावर मागण्या मान्य करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. ‘ऑनलाईन टॅक्सीचे कमीत कमी भाडे 100 ते 150 रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे 18 ते 23 रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे, दुरुस्तीसाठी गेलेल्या गाडीच्या मालकांकडून दैनंदिन भाडे आणि व्याज घेऊ नये’ या मागण्यांसाठी संप पुकारल्याचे ओला-उबर विभागाचे प्रमुख आणि संघटनेचे सचिव सुनील बोरकर यांनी सांगितले.