Heat Wave Affect Tea Industry : वाढत्या उष्णता (Heat Wave)मुळे देशभरातील पीकांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पीकांना जगवण्यासाठी अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी राहत आहेत. उत्तर बंगालमधे जवळपास 500 चहाच्या बागा (Tea Industry)आहेत. ज्यातून 640 दशलक्ष किलो चहाचे उत्पादन झाले होते. मात्र यंदा जास्त तापमानामुळे चहाच्या पिकावर विपरित परिणाम होत आहे. चहाची झुडुपे लाल होत आहेत, पानांची वाढ थांबत आहे. ज्यामुळे उद्योगात 30-35 टक्के घट झाली आहे. शिवाय, अलिकडच्या काही महिन्यांत या प्रदेशात पावसाची कमतरता जाणवली गेली आहे. ज्यामुळे कोरडेपणा वाढला आहे. काही ठिकाणी कृत्रिम सिंचन पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
सिलीगुडी येथील चहाचे बागायतदार सतीश मित्रुका यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्जेदार चहासाठी 28-30 अंश सेल्सिअस तापमानात उत्तम ठरते. या श्रेणीपेक्षा जास्त तापमान चहाच्या वाढीसाठी प्रतिकूल असते. चहाचे पीक हे मुख्यत: पावसावर अवलंबीत असते. पाऊस आला तर उद्योग टिकेल, अन्यथा तो टिकणार नाही. सध्या वातावरणात समशीतोष्णता आहे. परिणामी, ३५ टक्क्यांपर्यंत पीक तुटवडा निर्माण होईल ज्यामुळे त्याचा परिणामी चहाच्या किमतींवर होऊ शकतो.
सिलीगुडीचे आणखी एक चहाचे बागायतदार निरज पोद्दार यांच्या म्हणण्यानुसार, "चहा उद्योगासमोरील आव्हानांबद्दल चिंता म्हणजे प्रामुख्याने अतितापमान आणि अपुरा पाऊस आहे. अवांछित तापमान आणि पावसाच्या कमतरतेमुळे चहा उद्योगाला मोठा फटका बसला आहे. पावसाच्या मोठ्या तुटवड्यामुळे चहाच्या झुडपांना पाणीही देता येत नाही, ही एक मोठी चिंतेची बाब आहे फक्त पाऊस आणि सामान्य तापमानासाठी प्रार्थना करा."असे ते म्हणाले.
सिलीगुडी महाविद्यालयातील भूगोल विभागातील प्राध्यापक पार्थ प्रतिमा रॉय यांनी सांगितले की, गेल्या वर्षी या प्रदेशात काही प्रमाणात पाऊस पडला होता, परंतु, यावर्षी आतापर्यंत पावसाने दुर्लक्ष केले आहे. "पर्जन्यवृष्टीचा अभाव चहा उद्योगासाठी अत्यंत वाईट आहे आणि पानांच्या वाढीवर विपरित परिणाम करत आहे." असे, प्रोफेसर रॉय म्हणाले. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की, मे महिन्यात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवार आणि गुरुवार पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि झारखंडमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.