भाजप नेता, कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्याकडून पोलीस सेवेततील नोकरीचा राजीनामा
Wrestler & BJP leader Babita Phogat | (Photo Credits: ANI)

कुस्तीपटू बबीता फोगाट (Babita Phogat) यांनी हरियाणा पोलीस (Haryana Police) दलातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. बबीता फोगाट यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. त्यानंत अल्पावधीतच त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बबीता फोगाट यांनी राजीनामा देण्याचे कारण सांगताना म्हटले आहे की, 'आता मी भारतीय जनता पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासोबत काम करायचे असेल तर आपण आपल्या इतर पदांचा राजीनामा द्यायला हावा. त्यामुळे मी माझा राजीनामा प्रशासनाकडे 13 ऑगस्ट रोजीच दिला होता.'

बबीता फोगाट आणि त्यांचे वडील महावीर फोगाट यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बबीता यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहीले होते की, 'आज मी भारतीय जनता पक्षासोबत जोडली गेली असून, नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. मी आपणासही अवाहन करते की, आपणही भाजपसोबत जोडले जा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा.'

बबीता फोगाट यांचे वडील महावीर फोगाट यांना द्रोणाचार्य पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. ते यापूर्वी अजय चौटाला यांच्या जननायक पक्षासोबत काम करत होते. चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीमध्ये महावीर फोगाट हे स्पोर्ट विंगचे प्रमुखपद सांभाळत होते. भाजपमध्ये प्रवेस करताना महावीर फोगाट म्हणाले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करत आहेत. त्यांनी गृहमंत्री अमीत शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचा निर्णय ऐतिसिक आहे. या निर्णयाने हा देश एकजूट होण्यास मदत होणार आहे. मी पहिल्यापासून अशा निर्णयाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदी हे मला प्रेरणा देतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चांगली वाटचाल करतो आहे.' (हेही वाचा, कुस्तीपटू बबीता फोगाट हिने वडील महावीर फोगाट यांच्यासोबत केला भारतीय जनता पक्षात प्रवेश)

एएनआय ट्विट

दरम्यान, तंदुरुस्तीच्या कारणावरुन बबीता फोगाट गेले काही दिवस कुस्तीपासून काहीशी दूर आहे. मात्र, राजकीय आखाड्यातील प्रवेश बबीता फोगाट यांना किती यश मिळवून देतो याबाबत उत्सुकता आहे. भाजप पक्षात प्रवेश केल्यापासूनच फोगाय या आपल्या पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देतील असे संकेत होते. अखेर हे संकेत खरे ठरले. आता त्या बहुदा पूर्णवेळ राजकारणच करणार असाव्यात.