फक्त वासावरून सापाचे ठिकाण ओळखणारी महिला; सहज पकडला तब्बल 20 किलोचा अजगर (Video)
Woman rescues python in Ernakulum. (Photo Credit: Video Grab)

आपण बहुतेकदा पुरुषांना साप पकडताना पाहिले असेल, परंतु एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिला महाकाय अजगर पकडताना दिसत आहे. या अजगराचे वजन सुमारे 20 किलो आहे. व्हिडिओ कोची शहरातील आहे, जिथे विद्या राजू (Vidya Raju) यांनी हा अजगर पकडला आहे. महत्वाचे म्हणजे विद्या राजू या साप पकडण्यासाठी लोकप्रिय आहेत. फक्त वासावरून त्या सापाचे ठिकाण ओळखतात. विद्या राजू या वन्यजीवांना वाचविण्याचे काम करतात. गेल्या 25 वर्षांत त्यांनी आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक साप पकडले आहेत.

विद्या राजू यांनी पकडलेला अजगर -

यावर्षी केरळमध्ये आतापर्यंत झालेल्या भीषण पुरामुळे, घरांमध्ये आणि इमारतींमध्ये अनेक सापांनी आश्रय घेतला आहे. अशा परिस्थितीत सापापासून सुटका करण्यासाठी कोची येथून विद्या यांना अनेक फोन येत आहेत. सध्या याच कामात त्या प्रचंड व्यस्थ आहेत. विद्या या मूळच्या बिहारच्या असून त्यांचे पती एनव्हीएस राजू नौदलाचे सेवानिवृत्त कमांडर आहेत. विद्या गेल्या 25 वर्षांपासून गोव्याच्या नेव्ही कॅम्पसमध्ये आढळणारे घुबड, गरुड, कुत्री, मांजरी आणि साप यांचे अध्ययन करत आहेत.

(हेही वाचा: पश्चिम बंगालमधील एकारुखी गावात सापडला 2 डोकी असलेला दुर्मिळ साप; चमत्कार समजून लोकांनी पाजलं दुध)

एकदा अ‍ॅनिमल रेस्क्यू कॅम्पमध्ये वाइल्‍ड लाइफ एक्‍सपर्टने साप पकडून त्याला जंगलात सोडले होते. त्यावेळी विद्या यांनी प्रथम सापाला हातात घेतले. आता इतक्या वर्षानंतर हे साप जणू त्यांच्यासाठी मुलेच आहेत. त्यामुळे आता फक्त सापाच्या वासावरून विद्या त्यांना शोधून काढू शकतात.