Uber | Photo Credit -linkedin)

उबर चालकाकडून एका महिलेला त्रासदायक अनुभव (Uber Driver Misconduct) आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. म्हैसुर (Mysuru) शहरातील महिलेने हा आरोप केला असून, कंपनीने या तक्रारीची तत्काळ दखल घेत प्रतिसादही दिला आहे. संवाद रणनीतिकार निधी तारा यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर शेअर केलेल्या पोस्ट व्हायरल झाली. ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे जोरदार वाद निर्माण झाला असून, राइड-शेअरिंग (Ride-sharing) सेवा वापरणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

चालकाकडून अतिरिक्त पैशांची मागणी

निधी तारा हिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, म्हैसूर ते केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या प्रवासादरम्यान, उबर चालक आक्रमक झाला आणि मान्य केलेल्या भाड्याच्या पलीकडे त्याने अतिरिक्त ₹2,500 ची मागणी केली. जेव्हा तिने ते मान्य करण्यास नकार दिला, तेव्हा ड्रायव्हर संतप्त झाला आणि त्याने स्वत:वरील नियंत्रण गमावले. त्याने तिला आणि तिच्या कुटुंबालाही धमकावले. तो हातापाईवर आला होता, परंतू जवळच्या प्रत्यक्षदर्शींनी हस्तक्षेप केला, ज्यामुळे चालकाला घटनास्थळावरून निघून जावे लागले. (हेही वाचा, Shocking! उबर ड्रायव्हरने कॅबमध्ये चक्क महिला प्रवाशासमोर केले हस्तमैथुन; पिडीतेने कथन केला भयानक अनुभव)

दोन दिवसांनी चालक पुन्हा प्रवाशाच्या घरी

दरम्यान, हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही. काही दिवसांनंतर, तोच ड्रायव्हर अनपेक्षितपणे रात्री 10:30 वाजता म्हैसूरमधील तिच्या आजी-आजोबांच्या घरी आला. तो त्यांना त्रास देत होता आणि पैशांची मागणी करत होता. हे सर्व तो पूर्ववैमनस्यातून करत होता. तिने लिंक्डइनवर लिहिले, "मला हे सामायिक करावे लागेल असे मला कधीही वाटले नव्हते, परंतु सुरक्षेची चिंता सर्वोच्च आहे आणि या परिस्थितीवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. (हेही वाचा, US Woman Shoots Uber Driver: अपहरण समजून महिलेने उबेर चालकावर झाडल्या गोळ्या, हत्येचा गुन्हा दाखल)

उबेरकडून तात्काळ प्रतिसादाचा अभाव

दरम्यान, उबेरच्या अॅपद्वारे या घटनेचा अहवाल देऊनही निधीने कंपनीकडून वेळेवर किंवा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने निराशा व्यक्त केली. "या प्रकारचा कोणत्याही सेवा प्रदात्यासाठी मुद्दा-प्रवासानंतरचा छळ-हा प्रवासातील घटनांइतकाच गंभीर आहे. परंतु विशेषतः राइड-शेअरिंग उद्योगात, प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. मी तातडीची कारवाई करण्याची मागणी करत आहे ", असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. निधीने पोस्टला चालकाच्या ओळखीसह तिच्या प्रवासाचा तपशील देखील जोडला आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उबर आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.

चालकाने पूर्ववैमनस्यातून वर्तन केल्याचा दावा

व्हायरल झालेल्या पोस्टला प्रतिसाद म्हणून उबेरने या घटनेबद्दल माफी मागत निवेदन जारी केले. "नमस्कार निधी, आम्ही या परिस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि समजून घेतो की हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी किती त्रासदायक ठरले असेल. आम्ही पुष्टी करू शकतो की एक विशेष पथक सध्या या घटनेचा तपास करत आहे. माहिती मिळाली की, लगेच आम्ही आपल्याला पुढील अद्ययावत तपशील कळवते ", असे कंपनीने लिहिले. उबेरने आश्वासन दिले की आरोप गंभीरपणे घेतले जात आहेत आणि अंतर्गत चौकशी सुरू आहे.