मित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

दिल्ली: पतीपत्नीच्या नात्यात भांडणामुळे प्रेम वाढतं ही समजूत खोटी ठरवत  मागील काही दिवसात समोर आलेल्या घटना पाहता या भांडणाचं टोक नवरा किंवा बायकोच्या हत्येपर्यंत पोहचू शकतं असं वास्तव समोर येत आहे. दिल्लीत अलीकडे घडलेल्या एका प्रसंगात पती आपल्या मित्रांसाठी वारंवार चहा आणि भजी बनवायला सांगतो म्हणून वैतागलेल्या पत्नीने चक्क त्याच्या खुनाचा कट रचल्याची  बाब समोर येत आहे. पोलिसांच्या तपासानुसार सुरेश कुमार(Suresh Kumar) (वयवर्षे ५२) यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती या हत्येमागे दुसरं तिसरं कोणी नसून त्यांच्या पत्नीचाच हात असल्याचे समजत आहे.

सुरेश व त्यांची पत्नी अंजु कुमार यांच्यामध्ये 16 वर्षांचे अंतर होते, यामुळे अनेकदा त्यांच्यात भांडण व्हायची, दरम्यान अंजु हिला भावनिक आधार देणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु झाले होते. या प्रियकर तरुणाच्या सोबतीने अंजुने आपले पती सुरेश यांच्या हत्येचा सापळा रचला असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे.उत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या

सुरेश कुमार व त्यांचे जुगारु मित्र नेहमी कुमार यांच्या घरी जमायचे, यावेळी सुरेश नेहमी आपल्या पत्नीला मित्रांसाठी चहा व भजी बनवण्याचा हुकूम सोडायचे, हा प्रकार अंजु हिला अजिबात रुचत नव्हता. त्यामुळे तिने आपला प्रियकर शिवम ठाकूर याच्या मदतीने काही भाड्याच्या खुनींना आपल्या पतीच्या खुनाची सुपारी दिली. त्यानंतर ठरलेल्या प्लॅन नुसार सात जून ला अंजु आणि त्यांची मुले फिरण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडली आणि त्याच वेळी सुरेश हे घरात एकटे असताना या गुंडांनी त्यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केला. त्यांनतर जमलेल्या  शेजाऱ्यांनी सुरेशना तातडीने दवाखान्यत नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेबाबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला, शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे खुनाच्या आधी दोन मास्क घातलेल्या व्यक्तींना सुरेश यांच्या घरी जात असताना पहिले होते, तसेच हत्येच्या आधी अंजु फोनवर बोलत असल्याचे देखील समजले होते, यावरून संशयाची सुई अंजु वर येऊन थांबली पोलिसांनी तिच्या फोनचे रेकॉर्डिंग्स आणि कॉल चेक केल्यावर यामागे तिचा हात असल्याचे स्पष्ट झाले.तसेच यानंतर अंजुचा प्रियकर शिवम आणि त्याचा एक अल्पवयीन भाऊ यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशी दरम्यान अंजु ने पतीसोबतच्या भांडणाचे कारण सांगून आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. याआधी देखील अंजुने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता हे समजल्यावर शिवम याने 7,000 रुपये देऊन काही भाड्याच्या गुंडांसोबत हा खुनाचा डाव रचला होता.