भारत देश कोरोनामुक्त कधी होणार? देशातील  Lockdown महत्त्व आलेखांच्या माध्यामातून समजून घेत जाणून घ्या COVID-19 मधून आपली कधी पर्यंत होऊ शकते सुटका?
Coronafree India | Photo Credits: IANS

भारतामध्ये कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) घोषित करून आठ दिवस झाले. या आठवड्याभरात महाराष्ट्र (Maharashtra), केरळ (Kerala), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) , पश्चिम बंगाल (West Bengal) या राज्यात कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ पहायला मिळाली आहे. हा लॉकडाऊन 21 दिवसांचा असल्याने 14 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या संचारबंदी असल्याने नागरिकांना घरातच बसावं लागत आहे. पण या लॉकडाऊनच्या काळातही प्रत्येकाच्या मनात हा लॉकडाऊन कधी संपणार? जर लॉकडाऊनचा कालावधी वाढवला तर? जर वाढवला तर तो किती दिवस वाढेल? भारतामध्ये सारे सुरळीत कधी होणार? काही दिवसांपूर्वीच कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांनी भारतामध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा अद्याप विचार नाही. अशा बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं.

भारतामध्ये जसा दिवसागणिक आकडा वाढतोय तशी नागरिकांची अस्वस्थता आणि त्यांच्या मनातली भीती देखील वाढतेय. सध्या गजबजणार्‍या महानगरांमध्येही शुकशुकाट आहे. ना माणसांची ना गाड्यांची वर्दळ. देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 48 पर्यंत पोहचला आहे.

सध्या COVID-19 च्या रूग्णांचे प्रमाण पाहता IANS ने भारतातील लॉकडाऊनच्या भवितव्याबद्दल काही अंदाज मांडले आहेत. यामध्ये दोन वेगवेगळ्या परिस्थिती नमुद करण्यात आल्या आहेत.

  • जर भारतामध्ये 5-5 दिवसांच्या फरकाने 3 लॉकडाऊन जाहीर करण्यात आले तर देशात कोरोनाचा धोका तीव्रतेने वाढू शकतो.
  • जर भारतामध्ये 49 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला तर हा काळ संपेपर्यंत कोव्हिड 19 च्या रूग्णांचं देशातील प्रमाणही कमी होईल. त्यामुळे 13 मे 2020 पर्यंत भारतातून कोरोना व्हायरस पळालेला असेल.

अंदाजात वर्तवण्यात आलेली पहिली परिस्थिती काय सांगते?

जर भारतामध्ये 3 टप्प्यात लॉक डाऊन जाहीर झाले तर ही परिस्थिती आटोक्यात येण्यास जून 2020 पर्यंत वाट बघावी लागू शकते. 21 दिवसांच्या पहिल्या लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन जाहीर झाला तर तो 14 एप्रिल नंतर 28 दिवसांचा असू शकतो. पण त्यामध्ये 5 दिवसांची विश्रांती असेल. त्यामुळे दुसरा लॉकडाऊन अंदाजे 19-20 एप्रिल दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

लॉकडाऊनचं गणित (14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन + 5 दिवसांचा आराम+ 28 दिवसांचा लॉकडाऊन)

जर तिसरा लॉकडाऊन असेल तर तो 23 मेच्या आसपास जाहीर केला जाऊ शकतो. पण त्यामध्येही दुसरा लॉकडाऊन 17 मेला संपल्यानंतर 5 दिवसांचा फरक ठेवून जाहीर केला जाऊ शकतो. जर तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला तर तो 18 दिवसांचा असू शकतो. म्हणजे तो संपेपर्यंत 9 जून उजाडण्याची शक्यता आहे. ग्राफमध्ये तिसर्‍या लॉकडाऊननंतर कोरोना बाधितांची संख्या वाढवण्याचं प्रमाण कमी असेल. त्यामुळे या अंदाजानुसार 9 जूनपर्यंत कोव्हिड 19 वर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

लॉकडाऊनचं गणित (14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊन+ 5 दिवसांचा आराम + 28 दिवसांचा लॉकडाऊन + 5 दिवसांचा आराम +18 दिवसांचा लॉकडाऊन)

भारतातील लॉकडाऊनचा पॅटर्न काय अंदाज वर्तवतो?

अंदाजात वर्तवण्यात आलेली दुसरी परिस्थिती काय सांगते?

दुसर्‍या अंदाजामध्ये लॉकडाऊनचा कालावधी हा 49 दिवसांचा आहे. पण यामुळे कोव्हिड 19 वर पकडमिळवण्याची शक्यता देखील अधिक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. हा लॉकडाऊन सलग 49 दिवसांचा असेल त्यामुळे यामध्ये कोणताच ब्रेक नसेल. ग्राफमध्ये दाखवल्यानुसार 49 दिवसांच्या या कालात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत जाईल. तर हा 13 मे ला संपेल. पहिल्या अंदाजामध्ये लॉकडाऊन संपण्याचा काळ 9 जूनपर्यंत होता.

भारतामध्ये आज 1637 कोरोनाबाधित रूग्ण असून 38 जणांचा मृत्यू झाला असून 132 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत. आज 12 तासात 240 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. Coronavirus Pandemic: Covid 19 वर मात केल्यानंतर पुन्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो का?

मंगळवार (31 मार्च) दिवशी MIT संशोधकाने केलेल्या दाव्यानुसार, Journal of the American Medical Association (JAMA)मध्ये असे प्रकाशित करण्यात आले आहे की नव्या कोरोना व्हायरसच्या ड्रॉपलेटमध्ये 27 फीट पर्यंत प्रवास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे खोकताना, शिंकताना दोन माणसांमधील सुरक्षित अंतर वाढवण्याची गरज आहे. तज्ञांच्या मते 6 फीट म्हणजेच 2 मीटरचं अंतर ठेवणं गरजेचे आहे.

जगात धुमाकूळ घालणारं कोव्हिड 19 चं हे जागतिक संकट भारतामध्ये रोखायचं असेल तर 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी स्वयंशिस्त पालत social distancing च्या नियमांचं अवलंबन कटाक्षाने करणं आवश्यक आहे. या 21 दिवसांत जर भारतीयांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केले नाही तर भारत देश 21 वर्ष मागे जाऊ शकतो असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधताना म्हटले आहे.