Wayanad Landslide | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

वायनाड भूस्खलन (Wayanad Landslide) घटनेतील मृतांची संख्या आत 167 वर पोहोचली आहे. अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरुच असून, अनेक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. झालेल्या नुकसानीचा अद्यापही निश्चित आकडा प्रशासनाला ठरवता आला नाही. मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) घटनेवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. मदत आणि बचाव कार्याचा आढवा घेण्यासाठी त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली. तसेच उद्या (1 ऑगस्ट) ते घटनास्थळालाही भेट देणार आहेत. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार भूस्खलनाची घटनावायनाड जिल्ह्यात मेप्पडीच्या डोंगराळ भागात घडली.

नऊ राज्य मंत्र्यांचे शिष्टमंडळ वायनाडमध्ये तळ ठोकून

केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी आज सकाळी बाधित भागांना भेट दिली आणि मदत शिबिरांमध्ये बचावलेल्यांची भेट घेतली. नऊ राज्य मंत्र्यांचे शिष्टमंडळ सध्या वायनाडमध्ये असून, मदत छावण्यांमधील परिस्थितीचे आकलन करत आहे. केरळचे मुख्य सचिव व्ही वेणू म्हणाले, "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जमिनीवर भेदक रडारची मागणी करू शकते जे ड्रोनवर बसवले जाऊ शकते." (हेही वाचा, Wayanad Landslide Tragedy: वायनाड येथे भूस्खलन, 93 ठार, 120 हून अधिक जखमी)

विविध एजन्सीचे 1,200 बचाव कर्मचारी बचाव कार्यात सहभागी

भारतीय लष्कर, डीएससी सेंटर, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ, भारतीय नौदल आणि आयएएफ यासह विविध एजन्सीचे एकूण 1,200 बचाव कर्मचारी बचाव कार्यात सहभागी आहेत. मुख्य सचिव वेणू यांनी सांगितले की, मुंडक्काई आणि वरच्या भागात बचाव कार्यकर्ते वाचलेल्यांचा आणि मृतदेहांचा शोध घेत आहेत. खालच्या प्रवाहात सापडलेले मृतदेह विकृत रूपाने ओळखणे आव्हानात्मक आहे. (हेही वाचा, Kerala Wayanad Landslide Death Toll: केरळच्या वायनाड भूस्खलन दुर्घटनेमधील मृतांची संख्या 84 वर, 116 जखमींची नोंद, राज्यात दोन दिवसांचा शोक जाहीर- Reports)

भारतीय लष्कराच्या पूलावर भिस्त

व्ही वेणू यांनी पुढे सांगितले की,मोठमोठे दगड आणि पडलेल्या झाडांमुळे बचाव पथकांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे. उध्वस्त झालेली घरे शोधण्यासाठी दगड आणि माती बाजूला करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला जड उपकरणांची गरज आहे, परंतु अशी उपकरणे नदीच्या पलीकडे नेणे सध्या शक्य नाही. आम्हाला आशा आहे की भारतीय लष्कराकडून बांधण्यात येत असलेला बेली ब्रिज उद्यापर्यंत पूर्ण होईल. एझिमाला नौदल तळावरील आर्मी कॅनाईन युनिट आणि नौदलाचे पथक या बचावकार्यात सहभागी झाले आहेत. भारतीय तटरक्षक दल (ICG) देखील जमिनीवर मदत आणि पाटबळ पुरवत आहे. या प्रयत्नांनंतरही, शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत. मुंडक्काई आणि चूरलमला हे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आहेत, असेही वेणू म्हणाले.

वायनाडमध्ये 45 छावण्या

मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे की, वायनाडमध्ये 45 छावण्या उभारण्यात आल्या आहेत, ज्यात 3,000 हून अधिक विस्थापित लोकांना आश्रय देण्यात आला आहे. केरळचे विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांनी बचाव कार्यावर भर दिला आणि विस्थापितांसाठी घर भाड्याच्या तरतुदींचे आवाहन केले. "आम्ही उद्या सर्वपक्षीय बैठकीत हे मुद्दे उपस्थित करणार आहोत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत," असे सठेसन म्हणाले.