जून 2023 पर्यंत भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) सुमारे 2.74 लाख पदे रिक्त (Vacant Posts) आहेत, त्यापैकी 1.7 लाखांपेक्षा जास्त सुरक्षा श्रेणीतील आहेत. माहितीच्या अधिकारात (RTI) विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती मिळाली आहे. मध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, रेल्वेने लेव्हल-1 सह गट सी मध्ये 2,74,580 पदे रिक्त असल्याचे सांगितले आहे. यामध्ये सुरक्षा श्रेणीतील एकूण 1,77,924 रिक्त पदांचा समावेश आहे.
गौर यांच्या प्रश्नावर, मंत्रालयाने उत्तरात सांगितले की, ‘या वर्षी 1 जून पर्यंत, भारतीय रेल्वेच्या गट-सी (लेव्हल-1 सह) मध्ये एकूण अराजपत्रित रिक्त पदांची संख्या 2,74,580 आहे.’ आरटीआय उत्तरात पुढे असेही म्हटले आहे की, 'भारतीय रेल्वेमध्ये 1 जून गट-सीच्या सुरक्षा श्रेणीतील (स्तर-1 सह) एकूण मंजूर, विद्यमान आणि रिक्त पदांची संख्या अनुक्रमे 98,2037, 80,4113 आणि 1,77,924 आहे.' डिसेंबर 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, रेल्वेमध्ये 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत.
रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा म्हणाले की, थेट भरती, जलद पदोन्नती आणि प्रशिक्षणानंतर मुख्य नोकऱ्यांमध्ये नॉन-कोअर कर्मचार्यांची बदली करून रिक्त पदांचा प्रश्न सोडवला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2023 पर्यंत 1.52 लाख रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या रेल्वेने आधीच 1.38 लाख उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली आहेत, त्यापैकी 90 हजार सेवेत रुजू झाले आहेत. यातील 90 टक्के पदे सुरक्षा श्रेणीतील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Board Members Of Byju's Resigned: देशातील सर्वात मौल्यवान स्टार्टअपला आणखी एक धक्का; ऑडिटरसह बायजूच्या तीन मंडळ सदस्यांचा राजीनामा)
रेल्वे युनियनने मंत्रालयाकडे ट्रॅक देखभाल, फिटनेस, वरिष्ठ आणि कनिष्ठ विभाग अभियंता, गँगमन आणि तंत्रज्ञांच्या अधिक पदांची मागणी केली आहे. याआधी 2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर, रेल्वेने आपल्या झोनला विशेषत: सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्यासाठी ‘विशेष मोहीम’ सुरू करण्याचे निर्देश दिले.