Uttarakhand Glacier Burst Updates: उत्तराखंड येथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 74 मृतदेह सापडले व अजून 130 लोक बेपत्ता- Government
Glacier Breaks in Uttarakhand (फोटो क्रेडिट्स: ANI)

7 फेब्रुवारीला उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात ग्लेशियर (Glacier) फुटल्यामुळे मोठा पूर आला होता. या पुरात अनेक गावांचे नुकसान झाले, अनेक घरे वाहून गेली. या घटनेला आता जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे मात्र अजूनही या पुरात गायब झालेल्या काही लोकांची माहिती मिळू शकली नाही. गृह मंत्रालयाने लोकसभेत उत्तराखंडमधील पुरामुळे झालेल्या विध्वंसांविषयी भाष्य केले आहे. लोकसभेत एक प्रश्न विचारला गेला, ज्याच्या उत्तरात गृह मंत्रालयाने सांगितले की उत्तराखंडमधून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 74 मृतदेह सापडले आहेत आणि 130 लोक अद्याप बेपत्ता असल्याची नोंद आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की ऋषीगंगा आणि धौलीगंगा नद्यांमध्ये अचानक आलेल्या पुराचे कारण समजून घेण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आणि त्याबाबत सूचना करण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या विविध संस्था आणि संघटनांच्या तज्ज्ञांची संयुक्त अभ्यास टीम तयार केली गेली आहे. उत्तराखंड सरकारने हिमनदीपासून बनलेल्या नैसर्गिक तलावांचा आणि त्यावरील परिणामांचा आढावा घेण्यासाठीही एक समिती गठित केली आहे. राज्य सरकारने या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांसाठी 4 ते 4 लाख रुपयांची रक्कम जाहीर केली आहे.

अतिसंवेदनशील भागाच्या संरक्षणासाठी विविध ठिकाणी पूर्व चेतावणी प्रणाली आणि स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू केली गेली असल्याची माहिती उत्तराखंडने दिली आहे. दरम्यान, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील हिमालयी प्रदेशात वाढणारा मानवी हस्तक्षेप (Human Intervention) हवामान बदलांस अधिक असुरक्षित बनवित आहे. कदाचित म्हणूनच उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे हिमनग फुटल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात पूर आला, असे पर्यावरण तज्ज्ञांनी (Environment Experts) सांगितले आहे. (हेही वाचा: Uttarakhand Flood: नक्की का घडली उत्तराखंड दुर्घटना? कोण जबाबदार? जाणून घ्या काय म्हणतात Environment Experts)

‘हिमनगाचा स्फोट होणे ही एक दुर्मीळ घटना आहे. उपग्रह आणि गुगल अर्थ प्रतिमांमध्ये या प्रदेशाजवळील हिमवृष्टी दिसत नाही, परंतु त्या प्रदेशात पाण्याचे अनेक साठे असण्याची शक्यता आहे. हिमनगांमध्ये पाण्याच्या तलाव असू शकतात, यामुळेच ही घटना घडली असावी, असेही ते म्हणतात.