Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमधील एका कुटुंबाला सुमारे 3.9 लाख रुपयांचे वीज बिल (Kanpur Electricity Bill) आले आहे. धक्कादायक म्हणजे हे कुटुंब पत्र्याचे शेड असलेल्या घरात राहते आणि त्यांच्याकडे वापरली जाणारी विद्युत उपकरणेही अगदीच नाममात्र आहेत. असे असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर विजबील (Rs 3.9 Lakh Electricity Bill) आल्याने हे कुटुंब हबकून गेले आहे. दरम्यान, वीज विभागातील एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलेकी, तांत्रिक बिघाडामुळे हे बिल वाढले आहे. जे कमी करुन दिले जाईल.

पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबास लक्षवधी रुपयांचे बील

दरम्यान, ज्या कुटुंबाला तीन लाखाच्या घरात वीजबिल आले त्या घराचे कुटुंबप्रमुख चंद्रशेखर यांनी प्रदीर्घ काळ विजबील भरले नव्हते. त्यामुळे बिलाची थकीत रक्कम मिळून हे बिल आल्याचे वीज विभागातील अधिकारी सांगतात. दरम्यान, चंद्रशेखर यांनी वाढीव वीजबिल आल्याने स्थानिक वीज विभागाशी संपर्क साधला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये, चंद्रशेखर यांनी म्हटलेकी, ते आणि त्यांचे कुटुंब टिन शेड असलेल्या कच्च्या घरात राहतात. घरात एक कूलर, एक रेफ्रिजरेटर आणि दोन पंखे अशी किमान विद्युत उपकरणे वापरतात.

'तांत्रिक बिघाडामुळे चूक', वीज वितरण कंपनीचा खुलासा

कानपूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी (केस्को) मीडिया प्रभारी श्रीकांत रंगीला यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना म्हटले की, केसको सर्व्हरमध्ये केलेल्या बदलांनंतर गणना प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. काही वीज मीटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे डेटाची योग्य नोंदणी होऊ शकली नाही. लवकरच ग्राहकांची समस्या सोडवली जाईल आणि चंद्रशेखर यांना मोठे बिल भरावे लागणार नाही, अशी ग्वाही रंगिला यांनी दिली.

एक्स पोस्ट

तांत्रिक बिघाडामुळे वीजबिल अधिक येण्याच्या घटना काही नव्या नाहीत. या आधीही अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या घटना या आधी घडल्या आहेत. उल्लेखनिय म्हणजे बऱ्याच काळापूर्वी सांगली, कोल्हापूर येथील नागरिकांना चक्क शून्य रुपये विजबील आले होते. मजेशीर बाब अशी की, विद्युत मंडळाच्या प्रशासनाकडून झालेल्या तांत्रिक चुकीची नागरिकांनीही चांगलीच फिरकी घेतली होती. त्यासाठी काही नागरिकांनी विद्युत महामंडळाच्या बिल भरणा कार्यालयात जाऊन चक्क शून्य रुपये रक्कम टाकलेला धनादेश जमा केला होता. अर्थात महामंडळ अधिकाऱ्यांना आपली चूक उमगल्याने त्यांनी हा धनादेश स्वीकारला नाही. तसेच, अल्पावधीतच तांत्रिक चुक दुरुस्त करुन योग्य बिल ग्राहकांना देण्यात आले. या प्रकाराची तेव्हा जोरदार चर्चा रंगली होती.