US India Dosti: कोरोना संकटात अमेरिकेकडून भारताला वैद्यकीय मदत; मदतीची पहिली फेरी रवाना
US India Dosti | (Photo Credit: Twitter / US And India)

कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) भारतात अक्राळविक्राळ रुप धारण करत आहे. भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची गंभीर आणि तितकीच भयावह स्थिती पाहून जगभरातील देशांनाही चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे अमेरिका (USA), रशिया (Russia), इंग्लंड (England) आदी देश भारताच्या बाजूने मदतीसाठी उभे राहिले आहेत. अमेरिकेने भारताला वैद्यकीय मदत (US Helps India) देऊ केली आहे. या मदतीची पहिली फेरी शुक्रवारी (30 एप्रिल) सकाळी भारतात पोहोचली. भारतातील कोरोना व्हायरस संसर्गाने उच्चांक गाठला आहे आणि तो सातत्याने वाढतोच आहे. अशा काळात अमेरिकेकडून भारताला मदत मिळते आहे.

भारतात गेल्या आठवड्यापासून कोरोना संक्रमितांच्या संख्येत प्रतिदिन 3 लाखांहून अधिक नोंदली जात आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, बेड आणि औषधांचा तुटवडा असल्याचे पुढे येत आहे. काही ठिकाणी तर लसीकरणच ठप्प झाले आहे. वृत्तसंस्था एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेकडून पुरवण्यात आलेली वैद्यकीय मदत घेऊन एक विमान भारतात शुक्रवारी सकाळी विमानतळावर पोहोचले.

प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेन भारताला वैद्यकीय मदतीत 400 पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलेंडर, सुमारे 10 लाख रॅपीड कोरोना टेस्ट किट आणि इतरही काही चिकित्सा साहित्य पाठवले आहे. अमेरिकेच्या दुतावासाने फोटो शेअर करत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, अमेरिकेने भारताला पाठवलेली आपत्कालीन कोविड मदतीची पहिली फेरी भारतात पोहोचली. 70 वर्षांहूनही अधिक काळ एकमेकांना सहकार्य करणाऱ्या या देशासाठी यूनायटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका भारतासोबत उभा आहे. आम्ही कोविड 19 महामारी विरोधात लढतो आहोत. (हेही वाचा, US: कोरोना विषाणूसाठी पूर्णतः लसीकरण झालेल्या लोकांना Mask घालण्याची गरज नाही; अमेरिकन प्रशासनाचा मोठा निर्णय)

दरम्यान, याच आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन (Joe Biden) यांनी कोरोना महामारिवीरुद्ध भारताला सहकार्य करण्याचे सुतोवाच केले होते. बायडन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ज्या पद्धतीने भारताने अमेरिकेला मदत पाठवली होती. तशीच मदत अमेरिकाही भारताला करेन. कोरोना व्हायरस संसर्गाची सुरुवात झाली होती तेव्हा भारताने अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.