
Rare Birds Stolen: कबुतरबाजी (Kabootarbazi) खेळात विशेष प्राविण्य असलेल्या तब्बल 400 कबूतरांची चोरी (Pigeons Stolen) झाली आहे. धक्कादायक म्हणजे या कबुतरांची (Pigeon) किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील मोहम्मद कय्युम हे मोठे अनुभवी कबूतरबाज आहेत. त्यांच्याकडे देशी-विदेशी प्रजातीची शेकडो कबुतरे (Exotic Pigeons) आहेत. या खेळाचा त्यांना दशकांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. मात्र, सोमवारी त्यांनी प्रचंड धक्का बसला. जेव्हा गच्चीवर पाळलेली कबूतरे अचानक पिंजऱ्यासह गायब झाली. या धक्क्यातून कसेबसे सावरत कय्युम यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुघल काळपासून कबूतरबाजी प्रसिद्ध
मोहम्मद कय्युम हे पाठिमागील अनेक दशकांपासून कबूतर पाळतात. हा त्यांचा पारंपरीक खेळ, व्यवसाय असल्याचेही ते सांगतात. मुघलांपासून चालत आलेला कबूतरबाजी हा खेळ ते खेळतात. वर्षानुवर्षे कबुतरांचे संगोपन आणि प्रशिक्षण सुद्धा देतात. त्यासाठी आवश्यक आणि विशिष्ठ कौशल्य असलेली ही कबूतरे ते पाळतात आणि त्याचा व्यवसायही करतात. कबूतरांना शिकवताना खूप मेहनत असते. अथक मेहनतीनंतर एखादे कबूतर निष्णात बनते आणि स्पर्धेसाठी सक्षम होते. अशा प्रकारची विशेष प्राविण्य असलेली, काही शिकत असलेली आणि काही नवीनच आणलेली त्यांच्याकडे तब्बल 400 कबुतरे होती. जी सोमवारी अज्ञातांनी चोरुन नेली. ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. (हेही वाचा, Mumbai: मुंबईत 40 कबुतरे चोरून जास्त भावाने विकल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक)
विदेशी प्रजातीची प्रशीक्षित कबूतरे
प्रसारमाध्यमांशी बोलतान मोहम्मद कय्युम म्हणाला, रविवारी सायंकाळी पाहिली तेव्हा सर्व कबूतरे होती. पण, जेव्हा मी सोमवारी सकाळी गच्चीवर गेलो तर ती काही कबूतरे पिंजऱ्यासह गायब होती. तर पिंजरे रिकामे होते आणि कबूतरे गायब होती. यामध्ये अनेक वर्षे प्रशिक्षण देऊन तयार केलेली कबूतरेही चोरीस गेली आहेत, असे सांगत कय्युम हळहळ व्यक्त करतात. चोरीला गेलेले काही पक्षी दुर्मिळ परदेशी जातींचे होते आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्येही भाग घेतला होता, असेही ते म्हणाले. TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, कय्युम यांनी दावा केला की, त्यांच्या कबुतरांची एकूण संख्या 400 इतकी होती आणि त्यांची एकूण किंमत 10 लाख इतकी होती. (हेही वाचा, Pigeons Meat Sold As Chicken: धक्कादायक! चिकन म्हणून विकले कबुतरांचे मांस; मुंबई पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल)
पोलीस तपास सुरु
दरम्यान, या घटनेनंतर, कय्युम यांनी लिसाडी गेट पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली आहे. मेरठचे एसपी सिटी, आयुष विक्रम सिंह यांनी पुष्टी केली की, तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस सध्या गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी जवळच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
चोरी कशी करण्यात आली
प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, चोरांनी कबुतरांना पळवून नेण्यापूर्वी टेरेसवर चढण्यासाठी शिडीचा वापर केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मोठ्या संख्येने पक्षी चोरीला जात असूनही, रात्रीच्या वेळी परिसरातील कोणालाही संशयास्पद हालचाल दिसली नाही. कय्युमची कबुतरे पक्षीप्रेमींमध्ये एक प्रसिद्ध आकर्षण होती, ज्यामुळे स्थानिक समुदायासाठी चोरी आणखी धक्कादायक बनली. गुन्हेगारांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे.