Pigeons Meat Sold  As Chicken: धक्कादायक! चिकन म्हणून विकले कबुतरांचे मांस; मुंबई पोलिसांकडून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
Pigeons and Chicken | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई शहरातील आठ जणांवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. कबुतर (Pigeon) पाळणे आणि त्यांना ठार मारुन त्यांचे मांस (Pigeon Meat) जवळच्या हॉटेल आणि बिअर बारमध्ये चिकन (Chicken) म्हणून विकल्याचा या आठ जणांवर आरोप आहे. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी हरेश गगलानी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. गगलानी यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपी हे पक्षांना मारण्यापूर्वीच त्यांना पिंजऱ्यात बंद करुन घराच्या छतावर आणत असत. त्यानंतर त्यांना ठार मारुन त्यांचे मांस जवळच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये विकत असे.

गगलानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, मार्च 2022 पासून आरोपी कबुतर पाळत आहेत. सायन येथील गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनाही याची माहिती आहे. पण त्यांनी यावर कधीच आक्षेप घेतला नाही. आपली तक्रार आणि आरोपांच्या समर्थनार्थ आपल्याकडे काही फोटो असल्याचा दावाही गगलानी यांनी केला आहे. (हेही वाचा, Gujarat: कबूतराला वाचविण्याच्या नादात विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू)

दरम्यान, आरोपीने गगलानी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, गगलानी यांनी सोसायटीतील इतर सदस्यांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्याचा दावा केला आहे. सोसायटीतील एका सदस्याने सांगितले की, त्यांना इमारतीतील अनेकांविरुद्ध तक्रारी असतात.

भारतात कबुतरांची हत्या बेकायदेशीर आहे. केवळ कबुतरच नव्हे तर, कोणत्याही वन्य प्राणी अथवा पक्षाची हत्या करणे बेकायदेशीरआहे. भारतीय दंड संहितेतील कलम 428 आणि 429 कबुतरांचे संरक्षण करतात. वन्य कबुतरांना 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अतिरिक्त संरक्षण दिले जाते.