Omar Abdullah, Mehbooba Mufti (फोटो सौजन्य - फेसबुक)

Omar Abdullah Criticizes Mehbooba Mufti: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध जोरदार हल्ला सुरू आहे आणि दुसरीकडे, पाणी प्रकल्पाबाबत एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांच्यावर लोकप्रियता मिळवण्याचा आणि पाकिस्तानात बसलेल्या लोकांना खूश करण्याचा आरोप केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सिंधू पाणी करार हा जम्मू आणि काश्मीरच्या लोकांचा सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे म्हटले.

ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, खरंतर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वस्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि सीमेपलीकडे बसलेल्या काही लोकांना खूश करण्याच्या तुमच्या आंधळ्या लालसेने, तुम्ही हे मान्य करण्यास नकार देता की आयडब्ल्यूटी हा जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या हिताचा सर्वात मोठा ऐतिहासिक विश्वासघात आहे. मी नेहमीच या कराराला विरोध केला आहे आणि मी तो करत राहीन. एका स्पष्टपणे अन्याय्य कराराला विरोध करणे हे कोणत्याही प्रकारे युद्धखोरी नाही, तर ते जम्मू-काश्मीरच्या लोकांना आमचे पाणी स्वतःसाठी वापरण्याचा अधिकार नाकारणाऱ्या ऐतिहासिक अन्यायाची दुरुस्ती करण्याबद्दल आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी मेहबूबा मुफ्तींवर टीका - 

मेहबूबा मुफ्ती काय म्हणाल्या?

ओमर आणि मेहबूबा यांच्यातील हे शाब्दिक युद्ध एका ट्विटने सुरू झाले ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची बाजू मांडली. यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करून तणावाच्या काळात अशी मागणी केल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांना लक्ष्य केले. त्यांनी लिहिले की, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

मेहबूबा मुफ्ती यांनी पुढे लिहिलं आहे की, दोन्ही देश पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावरून परतत असताना, जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागले आहे. असे विधान करणे बेजबाबदार आणि धोकादायकपणे चिथावणीखोर आहे. आपल्या लोकांनाही देशातील इतर कोणत्याही नागरिकाइतकेच शांततेचा अधिकार आहे. पाण्यासारख्या आवश्यक गोष्टीला शस्त्र बनवणे केवळ अमानवीयच नाही तर द्विपक्षीय समस्येचे आंतरराष्ट्रीय समस्येत रूपांतर होण्याचा धोका आहे.

तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्प काय आहे?

तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्पाला वुलर बॅरेज असेही म्हणतात. 1980 च्या दशकात तो सुरू झाला. परंतु, पाकिस्तानच्या विरोधामुळे ते थांबविण्यात आले. हा प्रकल्प झेलम नदीवर असून या प्रकल्पाचे उद्दिष्ट जलवाहतूक आणि वीज निर्मितीला प्रोत्साहन देणे आहे. अलीकडेच, भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला होता.