गेल्या पाच महिन्यांत, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Rule Violations) केल्याची 40,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये सीटबेल्ट न लावता वाहन चालवण्याच्या 6,000 हून अधिक घटनांचा समावेश आहे. एक्स्प्रेस वेमुळे प्रवास जलद झाला असला तरी त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. या प्रकरणांना दुजोरा देताना, महाराष्ट्र परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डिसेंबर 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत नियम उल्लंघनाच्या एकूण 40,900 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये अतिवेगाने गाडी चालवण्याचा 6,983 घटना, लेन कटिंगच्या 6,441 घटना आणि सीटबेल्टशिवाय वाहन चालवण्याच्या 6,012 प्रकरणांचा समावेश आहे. डिसेंबर 2022 च्या तुलनेत सध्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी, अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार अनेक चालक अजूनही नियमांचे उल्लंघन करत आहेत.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की सुमारे 80% अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे होतात. ‘यंदा 6 एप्रिल रोजी, उर्से टोल प्लाझाजवळ रस्त्याच्या कडेला एका थांबलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने चार जण ठार झाले. तपासादरम्यान, ट्रक चालकाने महामार्गावर अवजड वाहन थांबवले होते, असे आढळून आले. यातील काही प्रवाशांनी सीटबेल्ट घातला नव्हता.’ (हेही वाचा: पुणे ठरलं जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर - रिपोर्ट)
याशिवाय, गेल्या गुरुवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोली एक्झिटजवळ 11 वाहने, बहुतेक कार्स ट्रकवर आदळल्याने अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले होते. या अपघातामागील एक प्रमुख कारण म्हणजे ओव्हरस्पीडिंग. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आली असून, अपघात कमी करण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनेक टीम काम करत आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.