टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. टोमॅटोच्या भावाने सध्या महागाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत, अशा स्थितीत घरातील स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब होताना दिसत आहेत. टोमॅटोने सर्वांचेच बजेट बिघडवले आहे, अशा स्थितीत टोमॅटो स्वस्त कधी होणार? अनेक शहरांमध्ये टोमॅटो 200 रुपये किलोने विकला जात आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिक त्यांची खरेदी टाळत आहेत. मात्र, दरम्यान, टोमॅटोच्या दरात लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: बेरोजगार व्यक्तीला 2.5 कोटींच्या टर्नओव्हरसाठी GST नोटीस; लाखो रुपये भरण्याचे आदेश, जाणून घ्या प्रकरण)
केंद्राने असा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दरात टोमॅटोचे वाटप केले जाणार आहे.
एका निवेदनात, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की 14 जुलैपासून टोमॅटो किरकोळ दुकानांद्वारे कमी दराने दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांना विकले जातील. मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) टोमॅटो खरेदी करतील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी किरकोळ किमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, त्या ठिकाणी टोमॅटो कमी किमतीत वितरित केले जातील.
मंत्रालयाने सांगितले की ज्या ठिकाणी टोमॅटोचा वापर जास्त आहे, त्यांना वितरणासाठी प्राधान्य दिले जाईल. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी असते, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय जुलैमध्ये पावसाळ्यामुळे वाहतुकीशी संबंधित अडचणींमुळेही दर वाढले आहेत.
दिल्ली आणि लगतच्या भागात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून आगमन होते. याशिवाय टोमॅटो उत्पादनात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर आहेत. नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पीक येण्याची अपेक्षा असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. निवेदनानुसार, "नजीकच्या भविष्यात किमती कमी होण्याची अपेक्षा आहे."
नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पिकांची आवक होणे अपेक्षित आहे. शिवाय, ऑगस्टमध्ये नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून अतिरिक्त पुरवठा होणे अपेक्षित आहे. मध्य प्रदेशातूनही आवक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दर कमी होण्याची शक्यता आहे.