Tirupati Temple | Image Used for Representational Purpose (Photo Credit: PTI)

'Take Voluntary Retirement Or Transfer': आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराशी (Tirupati Temple) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील नव्याने स्थापन झालेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने मंदिरात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांसाठी एक ठराव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार, मंदिर मंडळात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेणे किंवा आंध्र प्रदेशातील अन्य सरकारी विभागात बदली करणे यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. तिरुपती मंदिर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. काही काळापूर्वी मंदिरातील पवित्र प्रसादात भेसळ होत असल्याच्या बातम्यांवरून बराच गदारोळ झाला होता.

तिरुमला तिरुपती देवस्थानम हा एक स्वतंत्र सरकारी ट्रस्ट आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करते. TOI नुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम कायद्यात अलीकडच्या काळात तीनदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. मंदिर मंडळ आणि त्याच्याशी संलग्न संस्थांनी केवळ हिंदूंनाच काम दिले पाहिजे अशी अट घालण्याचा त्याचा उद्देश होता.

1989 मध्ये जारी केलेल्या आदेशात असेही म्हटले होते की, टीटीडी-प्रशासित पदांवर नियुक्त्या हिंदूंसाठी मर्यादित असतील. मात्र, सूत्रांनुसार, गैर-हिंदूंनी संघटनेत काम करणे सुरू ठेवले आहे. जून 2024 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर या मंदिरातील अनेक मुद्दे चर्चेत आले. सप्टेंबरमध्ये तिरुपतीच्या लाडू प्रसादममध्ये भेसळयुक्त तुपाचे प्रकरण समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर टीटीडीने प्रसादाची व्यवस्था बदलली. (हेही वाचा: Ghaziabad News: यूपीतील गाझियाबादच्या मंदिरातील धर्मशाळेत निकाह, हिंदू संघटनेकडून गोंधळ)

तिरुमला तिरुपती देवस्थानमचे नवीन अध्यक्ष बीआर नायडू यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे. मात्र, मंदिर मंडळात काम करणाऱ्या अहिंदू कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीटीडीच्या नव्या निर्णयामुळे बोर्डाच्या 7,000 कायम कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 300 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. या मंदिरात 14,000 कंत्राटी कर्मचारी देखील काम करतात. मंदिराचा हा निर्णय घटनेच्या कलम 16(5) वर आधारित आहे. हे कलम धार्मिक स्वरूपाच्या संस्थांना त्यांच्या धर्मातील सदस्यांना नोकरी देण्याचा अधिकार देतो.